आॅस्ट्रेलिया उपांत्य फेरीत
By admin | Published: March 21, 2015 01:15 AM2015-03-21T01:15:21+5:302015-03-21T01:15:21+5:30
स्टीव्हन स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानवर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहा गडी राखून शानदार विजय नोंदविला.
पाकवर सहा गड्यांनी मात : आता लढत भारताविरुद्ध
अॅडिलेड : हेजलवूडच्या नेतृत्वात गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीपाठोपाठ शेन वाटसन तसेच स्टीव्हन स्मिथ यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने शुक्रवारी पाकिस्तानवर विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यात सहा गडी राखून शानदार विजय नोंदविला. यामुळे भारत-आॅस्ट्रेलिया ही रोमहर्षक उपांत्य लढत २६ मार्च रोजी सिडनी मैदानावर निश्चित झाली आहे.
पाकने आॅस्ट्रेलियाला २१४ धावांचे लक्ष्य दिले होते. स्मिथच्या ६९ चेंडूत ६५ आणि वाटसनच्या ६६ चेंडूंतील सात चौकार व एका षटकारासह ठोकलेल्या नाबाद ६४ धावांच्या बळावर ३३.५ षटकांत चार बाद २१६ धावा करीत विजय साकार केला. मॅक्सवेलने २९ चेंडूत नाबाद ४४ धावांचे योगदान दिले. वाटसनने स्मिथसोबत चौथ्या गड्यासाठी ८९ धावांची तसेच मॅक्सवेलसोबत पाचव्या गड्यासाठी ७.१ षटकांत नाबाद ६८ धावांची भागीदारी करीत ९७ चेंडू आधीच विजयावर शिक्कामोर्तब केले. पाकला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी वॉट्सन आणि मॅक्सवेल यांचे झेल सोडल्याने आॅस्ट्रेलियाचा विजय सोपा झाला.
त्याआधी हेजलवूडच्या ३५ धावांतील चार बळींमुळे पाकचा संघ ४९.५ षटकांत २१३ धावांत गारद झाला. मिशेल स्टार्क आणि मॅक्सवेल यांनी हेजलवूडला साथ देत ४० आणि ४३ धावांत प्रत्येकी दोन गडी बाद केले. जॉन्सन आणि फॉल्कनर यांनी एकेक गडी टिपला. आॅस्ट्रेलियाची सुरुवातही वाईट झाली. सलामीचा अॅरोन फिंच २ हा तिसऱ्या षटकांत सोहेलच्या चेंडूवर पायचित झाला. त्याने रेफरल मागितले पण तिसऱ्या पंचाने हा निर्णय योग्य ठरविला. दुसरा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने काहीं आकर्षक फटके मारले पण तो देखील २४ धावा काढून वहाब रियाझचा बळी ठरला. वहाबने सतत टिच्चून मारा करीत आॅस्ट्रेलियावर दडपण आणले होते. कर्णधार मायकेल क्लार्क ८ याला फॉरवर्ड शॉर्टलेगवर झेल देण्यास बाध्य करताच आॅस्ट्रेलियाची स्थिती ३ बाद ५९ अशी झाली.
वहाबने वॉट्सनला देखील वारंवार त्रस्त केले. वॉट्सन अनेकदा बाद होण्यापासून बचावला. चार धावांवर असताना फाईन लेगवर राहत अलीने त्याचा सोपा झेल सोडला. वासन- स्मिथ यांनी डाव सावरल्यानंतर स्मिथने ५१ चेंडूंत अर्धशतक गाठले. अर्धशतकानंतर स्मिथ एहसान आदीलच्या चेंडूवर पायचित झाला. मॅक्सवेलला सुरुवातीलाच वहाब रियाझच्या चेंडूवर सोहेलने झेल सोडताच जीवदान मिळाले. दोन्ही झेल सोडल्याने वहाबने स्वत:ची चिडचिड मैदानावरच जाहीर केली. दरम्यान वाटसनने ५८ चेंडूंत स्वत:चे ३३ वे अर्धशतक गाठले. पाच चौकार आणि दोन षट्कार
मारणाऱ्या वॉट्सनने सोहेल खानला चौकार ठोकून सामना संपविला.
पाककडून हारिस सोहेल याने सर्वाधिक ४१ आणि कर्णधार मिस्बाहने ३४ धावा केल्या. पाकचा एकही फलंदाज चांगल्या सुरुवातीचा लाभ उठवू शकला नाही. एहसान आदील १५ राहत अली ६ यांनी काहीसा प्रतिकार करीत संघाच्या २०० धावा फळ्यावर लावल्या. सलामीवीर सर्फराज १० आणि त्याचा सहकारी अहमद शहजाद ५ हे लवकर बाद झाले. हारिस- मिस्बाह यांनी तिसऱ्या गड्यासाठी ७३ धावा करीत संघाला सावरले. मिस्बाह आणि हारिस बाद होताच पाकच्या ५ बाद १२४ धावा झाल्या होत्या. आफ्रिदीने १५ चेंडूंत तीन चौकार व एका षट्कारासह २३ धावा केल्या पण तो देखील हेजलवूडच्या चेंडूवर सीमारेषेजवळ फिंचकरवी झेलबाद होऊन परतला. (वृत्तसंस्था)
११
या विश्वचषकातील सात सामन्यात पाकिस्तान संघाने पहिल्या १० षटकात ११ गडी गमावले आहेत. त्यांचा दुसरा क्रमांक लागतो. तर सगळ्यात जास्त गडी गमविण्यात वेस्ट इंडिज संघांचा नंबर लागतो. त्यांनी १० षटकात १३ गडी गमावले आहे.
४३
एकदिवसीय सामन्यांत आॅस्ट्रेलियाने पाकिस्तानला ‘आॅल आउट’ केले आहे. याचबरोबर श्रीलंकेने ४१ तर न्यूझीलंडने ४० वेळेस पाकला ‘आॅल आउट’ केले आहे.
0७
आॅस्ट्रेलिया संघाने सातव्यांदा विश्वचषक सामन्यांची उपांत्य फेरी गाठली आहे. यानंतर भारत, पाकिस्तान व न्यूझीलंड या संघांचा नंबर लागतो. या तिन्ही संघांनी सहा वेळेस विश्वचषक सामन्यांत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली आहे.
कमी धावसंख्या असतानाही पाकिस्तानी गोलंदाजांनी आॅस्ट्रेलियावर फास आवळला होता. त्यांचे पहिले तीन फलंदाज ठरावीक अंतराने बाद करण्यात त्यांना यश आले होते; पण शेन वॉट्सन आणि ग्लेन मॅक्सवेल जोडी मात्र त्रासदायक बनली होती; पण संघाच्या ३ बाद ८३ धावा झाल्या असता वहाब रियाझच्या गोलंदाजीवर राहत अलीने वॉट्सनचा उंच उडालेला सोपा झेल सोडला आणि सामन्यावरील पाकिस्तानची पकड सुटली. यावेळी वॉट्सन फक्त चार धावांवर होता. मॅक्सवेल केवळ दोन धावांवर असताना त्यालाही सोहेल खानने जीवदान दिले. या विश्वचषकात पाकिस्तानने एकूण १५ झेल सोडले आहेत.
पाकिस्तान : अहमद शहजाद झे. क्लार्क गो. हेजलवूड ५, सर्फराज अहमद झे. वाटसन गो. स्टार्क १०, हारिस सोहेल झे. हॅडिन गो. जॉन्सन ४१, मिस्बाह उल हक झे. फिंच गो. मॅक्सवेल ३४, उमर अकमल झे. फिंच गो. मॅक्सवेल २०, शोएब मकसून झे. जॉन्सन गो. हेजलवूड २९, शाहीद आफ्रिदी झे. फिंच गो. हेजलवूड २३, वहाब रियाझ झे. हॅडिन गो. स्टार्क १६, अहसान आदील झे. स्टार्क गो, फॉल्कनर १५, सोहेल खान झे. हॅडिन गो. हेजलवूड ४, राहत अली नाबाद ६, अवांतर १०, एकूण :४९.५ षटकांत सर्वबाद २१३ धावा. गडी बाद क्रम : १/२०, २/२४, ३/९७, ४/११२, ५/१२४, ६/१५८, ७/१८८, ८/१८८, ९/१९५, १०/२१३. गोलंदाजी : स्टार्क १०-१-४०-२, हेजलवूड १०-१-३५-४, जॉन्सन १०-०-४२-१, मॅक्सवेल ७-०-४३-२, वाटसन ५-०-१७-०, फॉल्कनर ७.५-०-३१-१.
आॅस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर झे. अली गो. रियाझ २४, अॅरोन फिंच पायचित गो. खान २, स्मिथ पायचित गो. आदील ६५, मायकेल क्लार्क झे. मकसूद गो. रियाझ ८, शेन वाटसन नाबाद ६४, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ४४, अवांतर ९, एकूण : ३३.५ षटकांत ४ बाद २१६ धावा. गडी बाद क्रम : १/१५, २/४९, ३/५९, ४/१४८. गोलंदाजी : सोहेल खान ७.५-०-५७-१, एहसान आदील ५-०-३१-१, राहत अली ६-०-३७-०, वहाब रियाझ ९-०-५४-२, शाहीद आफ्रिदी ४-०-३०-०, हारिस सोहेल २-०-७-०.