आॅस्ट्रेलिया ‘क्लीन स्वीप’च्या उंबरठ्यावर
By admin | Published: January 7, 2017 04:30 AM2017-01-07T04:30:00+5:302017-01-07T04:30:00+5:30
पाकिस्तान संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पुन्हा पराभवाच्या खाईत लोटला गेला
सिडनी : पाकिस्तान संघ आॅस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवसअखेर पुन्हा पराभवाच्या खाईत लोटला गेला आहे. ४६५ धावांचे लक्ष्य गाठणाऱ्या पाकने ५५ धावांत एक गडी गमविला. ४१० धावांनी मागे असलेल्या पाहुण्या संघाचे नऊ फलंदाज शिल्लक आहेत.
फिरकी गोलंदाज नाथन लियॉन याने पदार्पण करणारा शार्जिल खान(४०)याला बाद केले. पाकसाठी मालिकेत सर्वाधिक धावा करणारा अझहर अली (११) आणि नाईट वॉचमन यासिर शाह (३) खेळपट्टीवर होते.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने दुसरा डाव २ बाद २४१ धावांवर घोषित केला. चौथ्या दिवशी १६ षटकांचा खेळ शिल्लक असताना यजमानांनी पाकला ४६५ धावांचे अशक्यप्राय लक्ष्य दिले. आॅस्ट्रेलियाने पहिला डाव ८ बाद ५३८ अशी मजल गाठून घोषित केला होता. प्रत्युत्तरात पाकने ३१५ धावा उभारल्या. उस्मान ख्वाजा याने ९८ चेंडंूत ७९ आणि पीटर हँडस्कोम्ब याने २५ चेंडंूत नाबाद ४० धावा ठोकल्या. ४३ चेंडूंत ५९ धावांचे योगदान देणारा स्मिथ स्वत: हॉटस्पॉटचा बळी ठरला. त्याच्या मालिकेत ४४१ धावा झाल्या.
डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात जलद (२३ चेंडू, ७ चौकार, ३ षट्कार) अर्धशतक ठोकून संघाला वेगवान सुरुवात करून दिली. याआधी २०१४ मध्ये पाकचा कर्णधार मिस्बाह उल हक याने अबुधाबी येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध २१ चेंडंूत ५० धावांची नोंद केली होती. वॉर्नरने २७ चेंडूंत ५५ धावा ठोकल्या. रियाझने त्याची दांडी गूल केली. (वृत्तसंस्था)