आॅस्ट्रेलिया ३०८ धावांत गारद
By Admin | Published: July 11, 2015 01:39 AM2015-07-11T01:39:14+5:302015-07-11T01:39:14+5:30
इंग्लंडने आॅस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांना लवकर तंबूत धाडताना अॅशेज क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.
कार्डिफ : इंग्लंडने आॅस्ट्रेलियाच्या तळातील फलंदाजांना लवकर तंबूत धाडताना अॅशेज क्रिकेट कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत महत्त्वपूर्ण आघाडी मिळवली आहे.इंग्लंडने तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत दुसऱ्या डावात १ बाद २१ धावा केल्या आहेत. त्यामुळे संघाची एकूण आघाडी १४३ धावांची झाली आहे.
उपाहाराला अॅथम लिथ ७ धावांवर, तर गॅरी बॅलेन्सने अद्याप खाते उघडले नाही. इंग्लंडने उपाहाराआधी कर्णधार अॅलेस्टर कुकची विकेट गमावली. तो १२ धावा केल्यानंतर डावखुरा वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कच्या पहिल्या षटकात पॉइंटवर नाथन लियोनच्या हाती झेल देऊन बाद झाला.
त्याआधी इंग्लंडच्या ४३० धावांच्या प्रत्युत्तरात आॅस्ट्रेलियाचा संघ ३०८ धावा करू शकला. त्यामुळे यजमान संघाला १२२ धावांची आघाडी मिळाली.
आॅस्ट्रेलियाकडून सलामीवीर ख्रिस रॉजर्सने सर्वाधिक ९५ धावा केल्या. कर्णधार मायकल क्लार्कने ३८ धावांचे योगदान दिले. इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी अचूक
टप्प्यावर गोलंदाजी केली. तसेच
मोईन अलीच्या फिरकीसमोरही आॅस्ट्रेलियन फलंदाज संघर्ष करताना दिसत होते.
१४ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये अॅशेज जिंकण्याच्या प्रयत्नात असलेल्या आॅस्ट्रेलियाने त्यांचे अखेरचे ५ फलंदाज फक्त ४४ धावांत गमावले. आज त्यांनी ५ बाद २६४ या धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली होती. शेन वॉटसन (३०) हा स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर पायचीत झाला.
वॉटसन त्याच्या कारकिर्दीत २८व्या वेळी पायचीत झाला. त्यानंतरचे स्टीव्हन स्मिथ, क्लार्क, अॅडम व्होजेस हे ३० ते ३९ धावांदरम्यान बाद झाले. त्यानंतर नाईट वॉचमन लियोन याला मार्क वूडने पायचीत करून आॅस्ट्रेलियाची स्थिती ७ बाद २६५ अशी केली. ब्रॅड हॅडीनने (२२) बेन स्टोक्सला सलग तीन चौकार
मारले; परंतु जेम्स अँडरसनच्या
चेंडूवर तो यष्टिरक्षक जोस बटलरच्या हाती झेल देऊन बाद झाला. इंग्लंडकडून अँडरसनने ४३ धावांत ३ गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक :
इंग्लंड पहिला डाव : ४३०, दुसरा डाव : १ बाद २१.
आॅस्ट्रेलिया : पहिला डाव : ३०८ (रॉजर्स ९५, मायकल क्लार्क ३८, स्मिथ ३३, वॉटसन ३०; जेम्स अँडरसन ३/४३, स्टुअर्ट ब्रॉड २/६०, वूड २/६६, अली २/७१).
(वृत्तसंस्था)