रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी, ४ विकेट्सने केली मात

By admin | Published: January 18, 2015 04:49 PM2015-01-18T16:49:11+5:302015-01-18T17:37:01+5:30

तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला.

Australia won the match in a colorful match, 4 wickets defeated | रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी, ४ विकेट्सने केली मात

रंगतदार सामन्यात ऑस्ट्रेलिया विजयी, ४ विकेट्सने केली मात

Next

ऑनलाइन लोकमत 

मेलबर्न, दि. १८ - तिरंगी मालिकेत रंगतदार सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर ४ गडी राखून विजय मिळवला. भारताने दिलेले २६८ धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने ४९ षटकांमध्ये गाठले असून सलामीवीर अॅरोन फिंचच्या ९६ धावांच्या खेळीने कांगारुनी भारतावर विजय मिळवला.

भारताचे २६८ धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांची सुरुवात चांगली झाली. अ‍ॅरोन फिंच आणि डेव्हीड वॉर्नर या जो़डीने अर्धशतकी सलामी करुन दिली. उमेश यादवने वॉर्नर २४ धावांवर असताना त्याला बाद केले.  फिंचने शेन वॉटसनसोबत संघाला शंभरी गाठून दिली. संघाच्या ११५ धावांवर असताना वॉटसन (४१ धावा) बाद झाला. ऑस्ट्रेलियन फलंदाजांसमोर भारताचा मारा निष्प्रभ ठरत होता. ऑस्ट्रेलियाने दोन गडी गमावत दोनशेचा पल्लाही ओलांडला होता.  स्टीव्ह स्मिथ ४७ धावांवर असताना मोहम्मद शमीने त्याला बाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर अ‍ॅरोन फिंचही ९६ धावांवर बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद २१९ अशी झाली. आर. अश्विनने जॉर्ज बेलीला स्वस्तात माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाची अवस्था ५ बाद २३० अशी केली. लागोपाठ तीन विकेट गेल्याने सामन्याला कलाटणी मिळाली आणि सामना रंगतदार अवस्थेत पोहोचला. ग्लेन मॅक्सवेल २० धावांवर बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया ६ बाद २४८ अशा अवस्थेत होता. कांगारुंना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाला १७ चेंडूत २० धावांची गरज होती. अक्षर पटेलने अचूक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियन फलंदाजांना रोखले. १२ चेंडूत १५ धावा अशा रोमहर्षक स्थितीत सामना पोहोचला होता. मात्र भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या ४९ व्या षटकात जेम्स फॉल्कनर आणि ब्रॅ़ड हॅडीन यांनी एकाच षटकात १५ धावा ठोकून संघाला विजय मिळवून दिला. सामन्यात सहा विकेट घेणारा मिशेल स्टार्कला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.  

दरम्यान, नाणेफेक जिंकून प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताची सुरुवात अत्यंत निराशाजनक होती. शिखर धवन २ धावा, अजिंक्य रहाणे १२ आणि विराट कोहली अवघ्या ९ धावांवर बाद झाल्याने भारताची अवस्था ३ बाद ५९ अशी झाली होती. मात्र त्यानंतर सलामीवीर रोहित शर्माने सुरेश रैनाच्या साथीने संयमी खेळी करत भारताचा डाव सावरला. या जोडीने चौथ्या विकेटसाठी १२६ धावांची भागीदारी केली. मिशेल स्टार्कने सुरैश रैनाला बाद करत ही जोडी फोडली. सुरेश रैना ५१ धावांवर बाद झाला. त्यानंतर कर्णधाऱ महेंद्रसिंग धोनीने सावध खेळी करत ३१ धावांमध्ये १९ धावा केल्या. मात्र मोठी खेळी करण्यात तो अपयशी ठरला व स्टार्कने त्याची विकेट घेतली. अक्षर पटेलही शून्यावर बाद झाल्याने भारताची अवस्था ६ बाद २३७ अशी झाली. अखेरीस रोहित शर्माने आर. अश्विनच्या मदतीने भारताला २५० चा पल्ला गाठून दिला. रोहित शर्मा १३८ धावांवर असताना स्टार्कच्या गोलंदाजीवर फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात शर्मा झेलबाद झाला. रोहित शर्माने एकदिवसीय सामन्यातील सहावे शतक ठोकून पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तर भूवनेश्वर कुमारही भोपळा न फोडता माघारी परतला. शेवटच्या षटकांत ऑस्ट्रेलियाच्या गोलदाजांनी अचूक मारा करत भारतीय फलंदाजांना रोखले आणि ५० षटकांत भारताने आठ गडी गमावत २६७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल स्टार्क हा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिशेल स्टार्कने १० षटकांत ४३ धावा देऊन भारताच्या सहा विकेट घेतल्या. तर गुरिंदर संधू आणि जेम्स फॉल्कनरने प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

Web Title: Australia won the match in a colorful match, 4 wickets defeated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.