आॅस्ट्रेलियाने मालिका जिंकली
By admin | Published: January 23, 2017 12:26 AM2017-01-23T00:26:28+5:302017-01-23T00:26:28+5:30
सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी खेळल्या गेलेल्या
सिडनी : सलामीवीर डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीच्या जोरावर विशाल धावसंख्या उभारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने रविवारी खेळल्या गेलेल्या चौथ्या वन-डे लढतीत पाकिस्तानचा ८६ धावांनी पराभव केला आणि पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.
पाकिस्तानचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे होते. त्यांनी अनेक झेल सोडले. त्याचा आॅस्ट्रेलियन फलंदाजांनी लाभ घेतला. सामनावीर वॉर्नरने ११९ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार व २ षटकारांच्या मदतीने १३० धावा केल्या. गेल्या सहा वन-डे लढतीतील त्याचे हे तिसरे शतक आहे. मॅक्सवेलने ४४ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व १ षटकाराच्या मदतीने ७८, तर हेडने ३६ चेंडूंमध्ये २ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने ५१ धावा केल्या. कर्णधार स्टीव्हन स्मिथने ४९ धावांची खेळी केली. प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या आॅस्ट्रेलियाने ६ बाद ३५३ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानचा डाव ४३.५ षटकांत २६७ धावांत संपुष्टात आला. शार्जील खानचे क्षेत्ररक्षण सुमार दर्जाचे झाले, पण त्याने ४७ चेंडूंना सामोरे जाताना १० चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ७४ धावांची खेळी करीत संघाला चांगली सुरुवात करून दिली. शोएब मलिक (४७), मोहम्मद हफीज (४०) व बाबर आजम (३१) यांनीही चांगली सुरुवात केली; पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. आॅस्ट्रेलियातर्फे फिरकीपटू अॅडम जम्पा व वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. ट्रॅव्हिस हेडने अचूक मारा करताना २ फलंदाजांना माघारी परतवले.
त्याआधी, वॉर्नरने उस्मान ख्वाजाच्या (३०) साथीने सलामीला ९२ धावांची भागीदारी केली, तर स्मिथसोबत दुसऱ्या विकेटसाठी १२० धावा जोडल्या. त्यानंतर मॅक्सवेल व हेड यांनी चौथ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी केली. वॉर्नरचे वन-डे कारकिर्दीतील १२ वे शतक आहे. वॉर्नर वैयक्तिक ११३ धावांवर असताना इमाद वसीमच्या गोलंदाजीवर हसन अलीने त्याचा सोपा झेल सोडला होता. स्मिथ वैयक्तिक १० धावांवर असताना शार्जील खानला त्याचा झेल टिपण्यात अपयश आले. हेड वैयक्तिक २८ धावांवर असताना शार्जीलने त्याला जीवदान दिले. मॅक्सवेलही वैयक्तिक ८ धावांवर असताना सुदैवी ठरला होता.
हसनच्या गोलंदाजीवर दोन झेल सुटले तरी तो पाकतर्फे सर्वाधिक यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५२ धावांत ५ बळी घेतले. (वृत्तसंस्था)