ऑस्ट्रेलिया विश्वविजेता
By Admin | Published: March 29, 2015 03:44 PM2015-03-29T15:44:55+5:302015-03-29T16:26:24+5:30
वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे.
ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. २९ - वर्ल्डकप फायनलमध्ये न्यूझीलंडवर सात विकेट्सनी मात करत ऑस्ट्रेलियाने पाचव्यांदा विश्वचषकावर नाव कोरले आहे. वन डे कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळणा-या मायकल क्लार्कने अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. न्यूझीलंडचे १८४ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने ३३.१ षटकांत ३ गडी गमावून गाठले.
रविवारी वर्ल्डकपचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात पार पडला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या भेदक मा-याने न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला. न्यूझीलंडने दिलेले १८४ धावांचे माफक आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठले. ट्रेंट बॉल्टच्या पहिल्याच षटकात सलामीवीर अॅरोन फिंचचा शून्यावर बाद झाल्याने ऑस्ट्रेलियाची स्थिती १ बाद २ धावा अशी होती. त्यानंतर डेव्हिड वॉर्नरने ४५ धावांची झंझावाती खेळी करत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा पाया रचला. वॉर्नर बाद झाल्यावर स्टिव्हन स्मिथने कर्णधार मायकेल क्लार्कला मोलाची साथ देत संघाला विजयाच्या दिशेने नेले. वन डेतील शेवटचा सामना खेळणा-या मायकल क्लार्कने सामन्यात अर्धशतक ठोकून संघाच्या विजयात महत्त्वाचे योगदान दिले. क्लार्क व स्टिव्हन स्मिथने ११२ धावांची भागीदारी केली. क्लार्क ७४ धावांवर असताना बाद झाला. क्लार्क बाद झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त ९ धावांची आवश्यकता होती. स्टिव्हन स्मिथने चौकार मारत संघाला दिमाखदार विजय मिळवून दिला. स्मिथने नाबाद ५६ धावांची खेळी केली.
दरम्यान प्रथम फलंदाजी करणा-या न्यूझीलंडच्या फलंदाजांची ऑस्ट्रेलियन मा-यासमोर भंबेरी उडाली होती. न्यूझीलंडला धडाकेबाज सुरुवात करुन देणारा कर्णधार ब्रँडन मॅक्यूलम पहिल्याच षटकांत शून्यावर बाद झाला. मिशेल स्टार्कचा भेदक मा-याने मॅक्यूलमने त्रिफळाचीत केले. यानंतर ग्लेन मॅक्सवेलच्या फिरकीने मार्टिन गुप्टिलला १५ धावांवर बाद केले. गुप्टिल वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला असून त्याने ९ सामन्यांमध्ये ५४७ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं व एका अर्धशतकाचा समावेश आहे. मिशेल जॉन्सनच्या गोलंदाजीवर केन विल्यम्सन १२ धावांवर झेलबाद झाला. यामुळे न्यूझीलंडची स्थिती १२.२ षटकांत ३ बाद ३९ अशी झाली. यानंतर रॉस टेलर व ग्रँट इलियट या जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत किवींचा डाव सावरला. या जोडीने न्यूझीलंडला ३५ षटकांत १५० धावा करुन दिल्या. मात्र पॉवर प्लेच्या पहिल्याच चेंडूवर रॉस टेलर ४० धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ कोरी अँडरसन व ल्यूक रॉंचीही शून्यावरच तंबूत परतले. डॅनियल व्हिटोरीने इलियटला साथ देण्याचा प्रयत्न केला. मात्र ९ धावांवर असताना व्हिटोरीही बाद झाल व न्यूझीलंडची स्थिती ७ बाद १६७ अशी झाली. ग्रँट एलियट ८३ धावांवर असताना विकेट किपरकडे सोपा झेल देत माघारी परतला. यानंतर मेट हेन्री शून्यावर बाद झाला. टीम साऊदी मॅक्सेवलच्या चपळ क्षेत्ररक्षणाने ११ धावांवर बाद झाला व न्यूझीलंडचा डाव १८३ धावांवर आटोपला.
ऑस्ट्रेलियातर्फे मिशेल जॉन्सन व जेम्स फॉल्कनर यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मिशेल स्टार्कने दोन तर ग्लेन मॅक्सवेलने एक विकेट घेतली. न्यूझीलंडचे चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. सामन्यात तीन विकेट घेणारा जेम्स फॉल्कनरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
--------------
विश्वविजयी ऑस्ट्रेलिया
वर्ष | यजमान | विजेता |
२०१५ | ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड | ऑस्ट्रेलिया |
२००७ | वेस्ट इंडिज | ऑस्ट्रेलिया |
२००३ | दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे | ऑस्ट्रेलिया |
१९९९ | इंग्लंड | ऑस्ट्रेलिया |
१९८७ | भारत, पाकिस्तान | ऑस्ट्रेलिया |