आॅस्ट्रेलियन फलंदाज अॅडम व्होग्सची निवृत्ती
By admin | Published: February 15, 2017 12:36 AM2017-02-15T00:36:44+5:302017-02-15T00:36:44+5:30
आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अॅडम व्होग्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाचा मधल्या फळीतील फलंदाज अॅडम व्होग्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्या श्रीलंका संघाविरुद्ध कॅनबरामध्ये खेळल्या जाणारा सराव सामना कुठल्याही आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध माझा अखेरचा सामना राहील, असे व्होग्सने जाहीर केले.
व्होग्स बुधवारी श्रीलंका संघाविरुद्ध पंतप्रधान इलेव्हन संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याने या लढतीच्या पूर्वसंध्येला निवृत्तीचे संकेत दिले.
व्होग्स सध्या ३७ वर्षांचा असून त्याने दोन वर्षांपूर्वी जून २०१५ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध डोमिनिका कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या लढतीत नाबाद १३० धावांची खेळी केली होती. पदार्पणाच्या लढतीत शतकी खेळी करणारा तो सर्वांत प्रौढ खेळाडू ठरला होता. इंग्लंड दौऱ्यात मात्र तो धावा फटकावण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र दिसले. त्यानंतर त्याने न्यूझीलंड व वेस्ट इंडिजविरुद्ध चमकदार कामगिरी केली.
व्होग्सने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद २६९ धावांची खेळी केली तर वेस्ट इंडिजविरुद्ध द्विशतक झळकावले. त्याच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये बाद न होता सर्वाधिक ६३४ धावा फटकावण्याच्या विक्रमाची नोंद आहे. व्होग्सन आपला अखेरचा कसोटी सामना नोव्हेंबर २०१६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होबार्टमध्ये खेळला होता. (वृत्तसंस्था)
१५ कसोटी सामन्यांनंतर त्याची सरासरी ९५.५० होती, पण श्रीलंका दौरा व त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांत त्याची कामगिरी विशेष चांगली नव्हती. त्यामुळे त्याच्या सरासरीमध्ये घसरण झाली.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये व्होग्सने २००७ मध्ये पदार्पण केले होते. त्याने कारकिर्दीत ३१ वन-डे सामन्यांत ४५.७८ च्या सरासरीने ८७० धावा तर सात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात ४६.३३ च्या सरासरीने १३९ धावा केल्या आहेत. (वृत्तसंस्था)