ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू फिल ह्युजचे निधन
By Admin | Published: November 27, 2014 10:24 AM2014-11-27T10:24:01+5:302014-11-27T12:53:16+5:30
सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले.
ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २७ -सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळल्याने जखमी झालेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिलीप ह्युज याचे आज सकाळी निधन झाले. अवघ्या २५ वर्षांचा ह्युज शेफिल्ड शिल्ड सामन्यादरम्यान मंगळवारी बाऊन्सर लागून व तो बेशुद्ध पडला. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतर तो कोमात गेला होता. गेल्या दोन दिवसांपासून तो मृत्यूशी झुंज देत होता, मात्र आज त्याचे निधन झाल्याने ही झुंज अपयशी ठरली. ह्युजच्या निधनामुळे क्रिकेटविश्वात हळहळ व्यक्त होत आहे.
शेफिल्ड शिल्ड सामन्यात दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करताना प्रतिस्पर्धी न्यू साऊथ वेल्सचा वेगवान गोलंदाज सीन एबोटचा एक उसळता चेंंडून ह्युजला लागला व गंभीर दुखापत झाल्याने तो मैदानातच कोसळला. सुरुवातीला एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने त्याच्यावर उपचार करण्यात आले व नंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर शस्त्रक्रियाही झाली व त्याला अतिदक्षता विभागात देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र डॉक्टरांचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले.
नोल्स राज्यातील एक लहान गावात जन्मलेल्या ह्युजने २६ कसोटी व २५5 वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. पण, राष्ट्रीय संघात त्याला त्याचे स्थान पक्के करता आले नाही. ह्युजला आखुड टप्प्याचा मारा खेळताना अडचण भासत होती. त्यामुळे त्यावर टीकाही झाली.कर्णधार क्लार्क दुखापतग्रस्त झाल्यामुळे प्रदीर्घ कालावधीनंतर ह्युजला भारताविरुद्ध 4 डिसेंबरपासून प्रारंभ होणा-या ब्रिसबेन कसोटीसाठी संघात स्थान देण्यात आले होते, मात्र त्याच्या मृत्युमुळे त्याची ही संधी कायमचीच हुकली.
दरम्यान ह्युजने सामन्यादरम्यान घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले असून त्यामुळे क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी वापरण्यात येणा-या वस्तूंच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली आहे.
फिलच्या मृत्यूचा सगळ्यांनाच मोठा धक्का बसला असून अनेक दिग्गज खेळाडूंनी ट्विटरवर दु:ख व्यक्त करत फिलला श्रद्धांजली वाहिली.
सचिन तेंडुलकर - फिल ह्यूजचा मृत्यू हा क्रिकेटसाठी अतिशय दु:खद दिवस आहे. ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देवो.
ब्रेट ली - फिलच्या मृत्यूचे वृत्त ऐकून खूप दु:ख झाले. त्याचे कुटुंबिय, मित्र परिवार आणि हितचिंतकांच्या दु:खा मी सहभागी आहे.
विराट कोहली - फिल ह्युजच्या मृत्यूच्या बातमीने मोठा धक्का बसला आहे. क्रिकेटसाठी हा खूपच वाईट दिवस आहे. फिलच्या कुटुंबियांना हे दु:ख पचवायची शक्ती मिळो.
युवराज सिंग - फिल ह्युज गेला यावर विश्वासच बसत नाही. आजचा दिवस क्रिकेटच्या इतिहासातील काळा दिवस आहे.
सुरेश रैना - फिल तू नेहमी आमच्या हृदयात राहशील.
हर्षा भोगले - सर्वांच्या आयुष्यात आनंद आणणारा क्रिकेटचा हा खेळ आज अतिशय दु:खा आहे. फिलच्या आत्म्यास शांती लाभो.
फिल ह्यूजची कारकीर्द :
- २६ फेब्रुवारी २००९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरोधात पहिली कसोटी.
- ११ जानेवारी २०१३ मध्ये श्रीलंकेविरोधा पहिला वन डे सामना खेळला.
- १८ जुलै २०१३ रोजी इंग्लंड विरोधातील सामना त्याची अखेरची कसोटी होती.
प्रथमश्रेणी कारकीर्द
सामने - ११४
धावा - ९०२३
सरासरी - ४६.५१
शतके - २६
अर्धशतकं -४६
सर्वोत्तम धावसंख्या नाबाद- २४३
कसोटी कारकीर्द
सामने- २६
धावा - १५३५
सरासरी- ३२.६५
शतके - ३
अर्धशतके - ७
सर्वोत्तम धावसंख्या - १६०
वन डे कारकीर्द
सामने -२५
धावा- ८२६
सरासरी- ३६.९१
शतके- २
अर्धशतके - ४
सर्वोत्तम धावसंख्या नाबाद - १३८