ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 12:55 IST2025-01-25T12:52:21+5:302025-01-25T12:55:55+5:30
Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत आज सबालेन्का विरूद्ध कीज अशी स्पर्धा रंगणार आहे

ऑस्ट्रेलियन ओपन : महिला फायनल मध्ये जिंकणाऱ्या विजेत्याला मिळणार तब्बल 'इतके' कोटी
Australian Open 2025 Price Money : ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ ची महिला एकेरीमधील अंतिम फेरी शनिवारी म्हणजेच आज रंगणार आहे. महिला एकेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेली आर्यना सबालेन्का आणि मॅडिसन कीज यांच्यात विजेतेपदाची लढत होणार आहे. सबालेन्का सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत पोहोचली आहे, तर कीज तिची दुसरी ग्रँड स्लॅम फायनल खेळणार आहे. शनिवारी अंतिम फेरीत दोन्ही खेळाडू आमनेसामने येतील, तेव्हा विजेतेपदासाठी दोघीही प्राण पणाला लावतील यात शंका नाही. ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणाऱ्या विजेत्याला कोट्यवधींचे बक्षीस मिळणार आहे.
सबालेन्का इतिहास रचेल?
सबालेन्का आणि कीज यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आहे. सबालेन्काने उपांत्य फेरीच्या सामन्यात पाउला बडोसाचा ६-४, ६-२ असा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. सबालेन्काने २०२३ आणि २०२४ चे ऑस्ट्रेलियन ओपन जिंकले. आता तिने पुन्हा एकदा विजेतेपद पटकावल्यास सलग तीन ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी सबालेन्का २१व्या शतकातील पहिली खेळाडू बनेल. तिच्याआधी गेल्या शतकात मार्गारेट कोर्ट स्मिथ, इव्हाना गूलागॉन्ग, स्टेफी ग्राफ आणि मोनिका सेलेस यांनी हा पराक्रम केला आहे. तर दुसरीकडे अमेरिकेच्या मॅडिसन कीजने उपांत्य फेरीत पोलंडच्या इंगा स्विटेकचा ५-७, ६-१, ७-६ (८) असा जिंकून विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश केला.
विजेत्या महिला स्पर्धकाला किती कोटी मिळणार?
ऑस्ट्रेलियन ओपन २०२५ च्या महिला एकेरीची अंतिम फेरी जी कोणीही खेळाडू जिंकेल, ती कोट्यवधींच्या बक्षीसाची मानकरी ठरेल. यावेळी अंतिम सामना जिंकल्यानंतर विजेत्याला ३५ लाख ऑस्ट्रेलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे १९ कोटी रुपयांची बक्षीसाची रक्कम मिळणार आहे.