आॅस्ट्रेलियन ओपन : फेडररने नदालला हरवून जिंकले १८ वे ग्रॅँडस्लॅम
By admin | Published: January 30, 2017 03:32 AM2017-01-30T03:32:57+5:302017-01-30T03:32:57+5:30
चुरशीच्या झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात केली आणि आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकाविले.
मेलबोर्न : महान टेनिसपटू रॉजर फेडररने वय वाढले असले तरी आपल्यात अजूनही विजयाची भूक शिल्लक असल्याचे दाखवून देत अत्यंत चुरशीच्या झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत राफेल नदालवर ६-४, ३-६, ६-१, ३-६, ६-३ अशी मात केली आणि आॅस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद पटकाविले. या विजयाने फेडररचा साडेचार वर्षांचा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दुष्काळ संपुष्टात आला. मेलबोर्न पार्कवरील हे त्याचे पाचवे विजेतेपद असून, कारकिर्दीतील अठरावे ग्रँडस्लॅम आहे. उल्लेखनीय म्हणजे फेडररने २०१० नंतर प्रथमच आॅस्ट्रेलियन ओपनचे आणि २०१२ नंतर प्रथमच ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले. याआधी फेडररने २०१२ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकाविले होते. त्यानंतर मात्र तब्बल साडेचार वर्षे अनेक वेळा ग्रॅँडस्लॅम स्पर्धांची अंतिम फेरी गाठूनही त्याला विजेतेपद पटकाविता आले नव्हते. अखेर आज त्याने नदालला नमवित ग्रँडस्लॅम विजेतेपदाची प्रतीक्षा संपुष्टात आणली.
टेनिसच्या पुरुष एकेरीमधील दोन दिग्गज असलेल्या रॉजर फेडरर आणि राफेल नदाल यांच्यातील अंतिम लढत तब्बल तीन तास ३८ मिनिटे रंगली. त्यांच्यातील धडाकेबाज खेळ पाहताना कोर्टवर उपस्थित असलेल्या हजारो प्रेक्षकांबरोबरच आजी-माजी टेनिसपटूंच्याही काळजाचा ठोका चुकत होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम लढतीत फेडररने दमदार सुरुवात करताना पहिला सेट ६-४ अशा फरकाने जिंकला. मात्र, नदालने दुसऱ्या सेटमध्ये ६-३ ने बाजी मारत सामन्यात कमबॅक केले. त्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये फेडररने पुन्हा आपला खेळ उंचावताना हा सेट ६-१ ने जिंकला; मात्र चौथ्या सेटमध्ये नदालने फेडररला मात देत या सेटवर ६-३ ने कब्जा केला. त्यानंतर पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये फेडररने जबरदस्त खेळाचे प्रदर्शन घडविले. त्याने या सेटमध्ये नदालने घेतलेली आघाडी मोडून काढत जोरदार मुसंडी मारली आणि सेट ६-३ ने जिंकत सेटसह आॅस्ट्रेलियन ओपनच्या विजेतेपदावर कब्जा केला. विजयानंतर
फेडररने मैदानावर जल्लोष केला.
या वेळी त्याला आनंदाश्रू अनावर झाले होते.(वृत्तसंस्था)