ऑस्ट्रेलियन ओपन: नदालचा विश्वविक्रम एक सामना दूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 07:40 AM2022-01-29T07:40:52+5:302022-01-29T07:41:28+5:30
ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक
मेलबर्न : स्पेनचा दिग्गज टेनिसपटूराफेल नदाल विश्वविक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदापासून केवळ एक सामना दूर आहे. त्याने इटलीचा लढवय्या खेळाडू मात्तेओ बेरेटीनी याचा कडवा प्रतिकार मोडून काढला. जेतेपदासाठी नदाल रशियाच्या डेनिस मेदवेदेवविरुद्ध भिडणार असून, मेदवेदेवने ग्रीसच्या स्टेफानोस सिटसिपास याला नमवले.
उपांत्य सामन्यात नदालने चार सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात बेरेटीनीचे आव्हान ६-३, ६-२, ३-६, ६-३ असे परतवले. नदालला विजय मिळवण्यासाठी २ तास ५५ मिनिटांपर्यंत झुंजावे लागले. नदाल सर्वाधिक ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवणाऱ्यांच्या यादीत संयुक्तपणे अव्वल स्थानी असून, त्याच्यासह स्वित्झर्लंडचा दिग्गज रॉजर फेडरर आणि जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला सर्बियाचा नोवाक जोकोविच यांनीही प्रत्येकी २० ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावली आहेत.
या स्पर्धेआधी नदालला दुखापतींनी ग्रासले होते, तसेच कोरोना महामारीमुळे तो काहीकाळ खेळापासूनही दूर राहिला होता. त्यामुळे त्यालाही आपल्या कारकिर्दीतील वाटचालीविषयी शंका वाटत होती. ऑस्ट्रेलियन ओपनच्या तयारीसाठी एका स्पर्धेत सहभागी झाल्यानंतर नदालने ती स्पर्धा जिंकली आणि त्यानंतर येथे सलग सहा सामने जिंकत अंतिम फेरीत धडक मारली. त्याचप्रमाणे, नदाल चारही ग्रँडस्लॅम जेतेपद किमान दोनवेळा पटकावणारा केवळ दुसराच खेळाडू ठरेल. दुसरीकडे, अन्य उपांत्य लढतीत अमेरिकन ओपन विजेता मेदवेदेवने अडीच तास रंगलेल्या सामन्यात सिटसिपासचे कडवे आव्हान ७-६ (७-५), ४-६, ६-४, ६-१ असे परतवले. गेल्या वर्षीही या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात मेदवेदेवने सिटसिपासला नमवत अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात त्याला जोकोविचविरुद्ध पराभूत व्हावे लागले होते.