आॅस्ट्रेलियन खेळाडूंनी संयम राखावा : डॅरेन लेहमन
By admin | Published: January 20, 2015 12:23 AM2015-01-20T00:23:47+5:302015-01-20T00:23:47+5:30
भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत झालेल्या वादानंतर डेव्हिड वॉर्नरला दंडाची शिक्षा सुनावण्यात आली
मेलबोर्न : भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मासोबत झालेल्या वादानंतर डेव्हिड वॉर्नरला दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याबाबत प्रतिक्रिया देताना आॅस्ट्रेलियाचे प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंवर टीका केली. खेळताना संयम राखण्याचा सल्ला लेहमन यांनी आॅस्ट्रेलियन खेळाडूंना दिला आहे.
लेहमन यांनी खेळाडूंना ताकीद देताना म्हटले आहे, की, मैदानावर खेळताना संयम राखणे आवश्यक आहे. आॅस्ट्रेलियन खेळाडूंना कुणी डिवचले, तरच त्यांच्याकडून नियमांचे उल्लंघन होते.’
आयसीसीने भारताच्या रोहित शर्मासोबत झालेल्या वादामुळे वॉर्नरला सामनाशुल्काच्या ५० टक्के रकमेचा दंड ठोठावला.
लेहमन म्हणाले, ‘‘ही चांगली बाब नाही. आयसीसीने याची दखल घेतली असून, कारवाई केली आहे. सामन्यानंतर या सर्व परिस्थितीबाबत गांभीर्याने विचार करण्याची गरज
आहे. डेव्हिडने त्याच्यावर दंड ठोठावण्यात आल्याचे सांगितले. सामना शुल्काच्या ५० टक्के रकमेची दंड म्हणून कपात करण्यात येणार आहे.’’
आम्ही त्याच्यासोबत चर्चा करू. प्रतिस्पर्धी संघासोबत चर्चा करताना प्रकरण मिटत नसेल तर ते अडचणीचे नाही; पण आपण नेहमी खेळावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. खेळाचा आदर करताना संयम राखणे आवश्यक आहे. मर्यादा ओलांडणे चुकीचे आहे.’’
संथ षटकगतीसाठी झालेल्या विलंबाबाबत बोलताना लेहमन म्हणाले, ‘‘प्रत्येक संघाला साडेतीन तास मिळतात. आम्हाला ३ तास ५६ मिनिटे लागली. आम्ही अनेक चेंडू वाईड टाकले आणि षटकादरम्यान आमची गती संथ होती. आम्हाला त्यावर काम करणे आवश्यक आहे. संघातील खेळाडूंसोबत याबाबत चर्चा केली. पुन्हा अशी चूक होणार नाही, याची खबरदारी घेण्यात येईल. नियोजित वेळेत सामना संपणे आवश्यक आहे.’’ (वृत्तसंस्था)
क्रिकेटसाठी हे योग्य नाही. क्रिकेट खेळताना मर्यादा ओलांडणे चुकीचे आहे. डेव्हिड आक्रमक खेळाडू असून, त्याला लवकर राग येतो. आम्हाला याची कल्पना आहे. डेव्हिड चांगला खेळाडू असून मैदानावर त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
-डॅरेन लेहमन