आॅस्ट्रेलियन संघ जाहीर
By admin | Published: January 16, 2017 05:28 AM2017-01-16T05:28:29+5:302017-01-16T05:28:29+5:30
आॅस्ट्रेलियाने फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांसाठी रविवारी १६ सदस्यांचा संघ जाहीर केला.
मेलबोर्न : आॅस्ट्रेलियाने फेब्रुवारी-मार्चमध्ये भारत दौऱ्यात खेळल्या जाणाऱ्या चार कसोटी सामन्यांसाठी रविवारी १६ सदस्यांचा संघ जाहीर केला. त्यात चार स्पेशालिस्ट फिरकीपटूंना स्थान देण्यात आले आहे. फिरकीची बाजू मजबूत करण्यासाठी लेग स्पिनर मिशेल स्वेपसनची निवड करण्यात आली आहे. त्याने अद्याप कसोटी पदार्पण केलेले नाही तर अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतर कसोटी संघात पुनरागमन केले आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील संघात सहा स्पेशालिस्ट फलंदाज, चार फिरकीपटू, तीन वेगवान गोलंदाज, दोन अष्टपैलू आणि एका यष्टिरक्षकाचा समावेश आहे.
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताविरुद्ध कसोटी मालिकेला २३ फेब्रुवारीपासून पुण्यामध्ये सुरुवात होणार आहे. त्यानंतर बेंगळुरू (४ ते ८ मार्च), रांची (१६ ते २० मार्च ) आणि धरमशाला (२५ ते २९ मार्च ) येथे सामने खेळले जातील. क्रिकेट आॅस्ट्रेलियाने स्पष्ट केले की, संघात केवळ तीन वेगवान गोलंदाजांना स्थान देण्यात आले आहे. बेंगळुरूमध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यानंतर राष्ट्रीय निवड समिती वेगवान गोलंदाजांची संख्या वाढविण्याबाबत विचार करणार आहे. आॅस्ट्रेलियाने २००४ नंतर भारतात कसोटी सामना जिंकलेला नाही.
संघाबाबत बोलताना अंतरिम राष्ट्रीय निवड समिती सदस्य ट्रॅव्हर होन्स म्हणाले, ‘समितीने फिरकीसाठी पर्याय मिळावा यासाठी अतिरिक्त फिरकीपटूची निवड केली आहे. प्रत्येक स्थळावरील खेळपट्टी कशी असेल याची आम्हाला कल्पना नाही. भारत दौरा खडतर असल्याची कल्पना आहे. तेथे परिस्थितीसोबत जुळवून घेताना अडचण भासते.’
क्वीन्सलंडचा २३ वर्षीय स्वेपसन मुख्य फिरकीपटू नॅथन लियोन, एश्टन एगर व स्टीव्ह ओकिफे यांना सहकार्य करेल. कसोटी सामना खेळण्याचा अनुभव नसलेला स्वेपसन संघातील एकमेव सदस्य आहे.
होन्स पुढे म्हणाले, ‘मिशेल स्वेपसन युवा खेळाडू आहे. त्याच्यात क्षमता असून, त्याला संधी मिळायला हवी. एश्टन चांगला फिरकीपटू असून, फलंदाजी करण्यासही सक्षम आहे. संघातील काही खेळाडू दुबईतील आयसीसी अकादमीमध्ये सराव शिबिरासाठी २९ जानेवारीला रवाना होणार आहेत, तर अन्य खेळाडू न्यूझीलंडमध्ये मालिकेमध्ये सहभागी होतील.’ (वृत्तसंस्था)
>आॅस्ट्रेलिया संघ
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, एश्टन एगर, जॅक्सन बर्ड, पीटर हँड््सकोंब, जोश हेजलवूड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियोन, मिशेल मार्श, शॉन मार्श, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह ओकिफे, मॅथ्यू रेनशॉ, मिशेल स्टार्क, मिशेल स्वेपसन, मैथ्यू वॅड (यष्टिरक्षक).