आॅस्ट्रेलियाने इंग्लंडला लोळवले
By Admin | Published: February 14, 2015 11:27 PM2015-02-14T23:27:06+5:302015-02-14T23:27:06+5:30
आॅस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा १११ धावांनी धुव्वा उडवला.
मेलबोर्न : सलामीवीर अॅरोन फिंचने स्पर्धेतील पहिले शतक झळकावल्यानंतर मिशेल मार्शच्या (५ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर यजमान आॅस्ट्रेलियाने शनिवारी विश्वकप स्पर्धेत आपल्या पहिल्या लढतीत परंपरागत प्रतिस्पर्धी इंग्लंडचा १११ धावांनी धुव्वा उडवला. इंग्लंडतर्फे हॅट््ट्रिक नोंदविणारा स्टीव्हन फिन व नाबाद ९८ धावांची खेळी करणारा जेम्स टेलर यांचे प्रयत्न अखेर अपुरेच पडले.
फिंच (१३५) आणि ग्लेन मॅक्सवेल (६६ धावा, ४० चेंडू) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने ९ बाद ३४२ धावांची दमदार मजल मारली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने अखेरच्या ३ चेंडूंवर ३ बळी घेत २०१५च्या विश्वकप स्पर्धेत पहिली हॅट््ट्रिक नोंदविली; पण तोपर्यंत आॅस्ट्रेलियाने विशाल धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात खेळताना इंग्लंडचा डाव ४१.५ षटकांत २३१ धावांत संपुष्टात आला. जेम्स टेलरने नाबाद ९८ धावांची खेळी केली; पण त्याला दुसऱ्या टोकाकडून अपेक्षित साथ लाभली नाही.
जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या आॅस्ट्रेलियातर्फे मार्शने ९ षटकांत ३३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले, तर मिशेल स्टार्क व मिशेल जॉन्सन यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना माघारी परतवले. लक्ष्याचा पाठलाग करताना एक वेळ इंग्लंडची ६ बाद ९२ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर टेलर व ख्रिस व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करून डाव सावरला; पण आवश्यक धावगती राखण्यात त्यांना अपयश आले.
त्याआधी इंग्लंडने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. आॅस्ट्रेलियातर्फे फिंचने १२८ चेंडूंना सामोरे जाताना १३५ धावांची खेळी केली.
फिंचच्या खेळीत १२ चौकार व ३ षटकारांचा समावेश आहे, तर मॅक्सवेलने ११ चौकार ठोकले. फिंचने गृहमैदानावर पहिले शतक ठोकले. कर्णधार जॉर्ज बेलीने ६९ चेंडूंमध्ये ५५ धावांची खेळी केली. बेलीने फिंचसोबत चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी केली. बेलीने अर्धशतकी खेळीत ३ चौकार ठोकले.
यापूर्वी तीन वेळा उपविजेतेपदावर समाधान मानणाऱ्या इंग्लंडतर्फे स्टीव्हन फिनने अखेरच्या षटकातील अखेरच्या ३ चेंडूंवर ब्रॅड हॅडिन (३१), ग्लेन मॅक्सवेल (६६) आणि मिशेल जॉन्सन (०) यांना तंबूचा मार्ग दाखविला. फिंचला जेम्स अँडरसनच्या गोलंदाजीवर ख्रिस व्होक्सने जीवदान दिले, त्या वेळी त्याने खातेही उघडले नव्हते. ब्रॉडने डेव्हिड वॉर्नर (२२) आणि शेन वॉटसन (०) यांना एकापाठोपाठ माघारी परतवून इंग्लंडला वर्चस्व गाजविण्याची संधी प्रदान केली. पण, त्यानंतर बेली व फिंच यांनी चौथ्या विकेटसाठी १४६ धावांची भागीदारी करून डाव सावरला. इंग्लंडची सुरुवात निराशाजनक झाली. मोईन अली (१०) व गॅरी बॅलन्स (१०) यांना मोठी खेळी करता आली नाही. त्यानंतर इयान बेल (३६) व जो रुट (५) यांना मार्शने १४व्या षटकात एकापाठोपाठ माघारी परतवून आॅस्ट्रेलियाला वर्चस्व मिळवून दिले. धावफलकावर ७३ धावांची नोंद असताना इंग्लंडचा निम्मा संघ तंबूत परतला होता. टेलर व व्होक्स यांनी सातव्या विकेटसाठी ९२ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. व्होक्स (३७ धावा, ४२ चेंडू) बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना विशेष छाप पाडता आली नाही. टेलरने ९० चेंडूंमध्ये नाबाद ९८ धावांची खेळी केली. त्यात ११ चौकार व २ षटकारांचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
धावफलक
आॅस्ट्रेलिया :- डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. ब्रॉड २२, अॅरॉन फिंच धावबाद (मॉर्गन) १३५, शेन वॉटसन झे. बटलर गो. ब्रॉड ००, स्टिव्हन स्मिथ त्रि. गो. व्होक्स ०५, जॉर्ज बेली त्रि. गो. फिन ५५, ग्लेन मॅक्सवेल झे. रूट गो. फिन ६६, मिशेल मार्श झे. रूट गो. फिन २३, ब्रॅड हॅडिन झे. ब्रॉड गो. फिन ३१, मिशेल जॉन्सन झे. अॅन्डरसन गो. फिन ००, मिशेल स्टार्क नाबाद ००. अवांतर (५). एकूण ५० षटकांत ९ बाद ३४२. गोलंदाजी : अॅन्डरसन १०-०-६७-०, ब्रॉड १०-०-६६-२, व्होक्स १०-०-६५-१, फिन १०-०-७१-५, अली ९-०-६०-०, रूट १-०-११-०.
इंग्लंड :- मोईन अली झे. बेली गो. स्टार्क १०, इयान बेल झे. स्टार्क गो. मार्श ३६, गॅरी बॅलन्स झे. फिंच गो. मार्श १०, ज्यो रूट झे. हॅडिन गो. मार्श ०५, इयान मॉर्गन झे. हॅडिन गो. मार्श ००, जेम्स टेलर नाबाद ९८, जोस बटलर झे. स्मिथ गो. मार्श १०, ख्रिस व्होक्स झे. स्मिथ गो. जॉन्सन ३७, स्टुअर्ट ब्रॉड त्रि. गो. स्टार्क ००, स्टिव्हन फिन झे. व गो. जॉन्सन ०१, जेम्स अॅन्डरसन धावबाद (मॅक्सवेल) ०८. अवांतर (१६). एकूण ४१.५ षटकांत सर्व बाद २३१.
गोलंदाजी : स्टार्क ९-१-४७-२, हेजलवूड ६.५-०-४५-०, जॉन्सन ८-०-३६-२, मार्श ९-०-३३-५, वॉटसन ३-०-१३-०, मॅक्सवेल ४-०-३३-०, स्मिथ २-०-१९-०.
मेलबोर्न : इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टीव्हन फिनने शनिवारी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या लढतीत अखेरच्या ३ चेंडंूवर ३ बळी घेऊन हॅट््ट्रिक पूर्ण केली. विश्वकप स्पर्धेत हॅट््ट्रिक घेणारा तो जगातील सातवा, तर इंग्लंडचा पहिला गोलंदाज ठरला. आॅस्ट्रेलियाच्या डावातील अखेरच्या ३ चेंडूंवर त्याने ही कामगिरी केली.