आॅस्ट्रेलियाचा ८००वा कसोटी सामना
By admin | Published: March 15, 2017 01:19 AM2017-03-15T01:19:03+5:302017-03-15T01:19:03+5:30
आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे.
नवी दिल्ली : आजपासून १४० वर्षांपूर्वी १५ मार्च १८८७ रोजी मेलबोर्नमध्ये इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेटची सुरुवात करणारा आॅस्ट्रेलिया संघ या प्रवासात रांचीमध्ये एक नवा विक्रम नोंदवणार आहे. भारताविरुद्धचा तिसरा कसोटी सामना आॅस्ट्रेलियाच्या कसोटी इतिहासातील ८००वा कसोटी सामना ठरणार आहे. स्टीव्हन स्मिथच्या नेतृत्वाखालील संघ ही लढत संस्मरणीय ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहील.
आॅस्ट्रेलिया ८०० कसोटी सामने खेळणारा जगातील दुसरा देश ठरणार आहे. इंग्लंडने यापूर्वी ही कामगिरी केली आहे. इंग्लंडच्या नावावर ९८३ कसोटी सामन्यांची नोंद आहे. इंग्लंडने ८००वा कसोटी सामना ७ नोव्हेंबर २००२ रोजी आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेनमध्ये खेळला होता. त्या लढतीत त्यांना ३८४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. रांचीमध्ये प्रथमच कसोटी सामन्याचे आयोजन होत असून, हा एक ऐतिहासिक सामना ठरणार आहे. कारण आगामी एक दशकापेक्षा अधिक कालावधीत कुठला अन्य देश ८०० कसोटी सामने खेळण्याची शक्यता नाही. इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियानंतर वेस्ट इंडीज (५२०) संघाचा क्रमांक आहे. ८००च्या आकड्यापासून हा संघ बराच दूर आहे.
भारतीय संघाचा विचार करता ५१० कसोटी सामने खेळणारा भारतीय संघ चौथ्या स्थानी आहे. त्यानंतर न्यूझीलंड (४२०), दक्षिण आफ्रिका (४०९), पाकिस्तान (४०७), श्रीलंका (२५७), झिम्बाब्वे (१०१), बांगलादेश (९९) आणि आयसीसी विश्व इलेव्हन (१) यांचा क्रमांक लागतो.
आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत ७९९ कसोटी सामने खेळले असून, त्यांत ३७७ सामन्यांत विजय मिळविला, तर २१४ सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. दोन सामने टाय झाले, तर उर्वरित २०६ सामने अनिर्णीत राहिले. सध्याच्या मालिकेदरम्यान आॅस्ट्रेलियन संघ भारतात कसोटी सामन्यांचे अर्धशतक पूर्ण करणार आहे. धरमशाला येथे होणारा चौथा कसोटी सामना भारतातील त्यांचा ५०वा कसोटी सामना असेल. आॅस्ट्रेलियाने सर्वाधिक ३४१ सामने इंग्लंडविरुद्ध खेळले आहेत. त्यानंतर वेस्ट इंडीज (११६), दक्षिण आफ्रिका (९४) आणि भारत (९२) यांचा क्रमांक लागतो. आॅस्ट्रेलियाने एक लढत आयसीसी विश्व इलेव्हन संघाविरुद्धही खेळली आहे. आॅस्ट्रेलियाने मायदेशात ४१०, तर विदेशात ३७९ आणि तटस्थ स्थळावर १० कसोटी सामने खेळले आहेत. आॅस्ट्रेलियाने आतापर्यंत तीन दिवस-रात्र कसोटी सामने खेळलेले आहेत.
आॅस्ट्रेलियाने मायदेशानंतर सर्वाधिक १७१ सामने इंग्लंडमध्ये खेळले आहेत. दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीजमध्ये प्रत्येकी ५० सामने खेळले आहेत. या महिनाअखेर भारताचा या यादीमध्ये समावेश होणार आहे. (वृत्तसंस्था)
आॅस्ट्रेलियाने सर्वांत कमी सामने झिम्बाब्वेमध्ये (१ कसोटी) खेळले आहेत. ही लढत १९९९मध्ये खेळली गेली होती.
रांची ठरणार भारताचे २६ वे कसोटी केंद्र
रांची : महेंद्रसिंह धोनीने येथील स्टेडियमच्या उद््घाटनप्रसंगी डफ वाजविला होता. त्याची ही प्रतिमा येथील स्थानिक नागरिकांच्या हृदयात कायम आहे; पण चार वर्षांनंतर हे शहर भारताचे २६ वे कसोटी केंद्र म्हणून आपले नाव अधोरेखित करीत असताना येथील मूड मात्र निराशाजनक आहे. रांचीमध्ये गुरुवारपासून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारत व आॅस्ट्रेलिया संघांदरम्यान तिसरा कसोटी सामना खेळला जाणार
आहे. या शहरात हा पहिलाच
कसोटी सामना आहे; पण शहराचा सर्वांत आवडता सुपुत्र दिल्लीमध्ये स्थानिक वन-डे संघाचे नेतृत्व करण्यात व्यस्त आहे.