बालेकिल्ल्यातच उडाली ऑस्ट्रेलियाची दाणादाण
By admin | Published: November 7, 2016 05:18 PM2016-11-07T17:18:16+5:302016-11-07T17:18:16+5:30
पर्थच्या बालेकिल्ल्यातच कसोटी सामन्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करण्याचा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने आज करून दाखवला.
Next
ऑनलाइन लोकमत
पर्थ, दि. 7 - ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवणे म्हणजे अशक्याप्राय गोष्ट. त्यात जगातील सर्वात लौकिक असलेले पर्थमधील 'वाका'ची खेळपट्टी हा तर ऑस्ट्रेलियन संघाचा बालेकिल्लाच. पण या बालेकिल्ल्यातच कसोटी सामन्यामध्ये यजमान ऑस्ट्रेलियाला चारीमुंड्या चीत करण्याचा पराक्रम दक्षिण आफ्रिकेने आज करून दाखवला. पर्थ येथे झालेल्या पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर 177 धावांनी मात करत कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली. गेल्या चार वर्षांमध्ये घरच्या मैदानावर झालेला हा ऑस्ट्रेलियाचा हा पहिलाच पराभव आहे.
आज सामन्यातील शेवटच्या दिवशी पराभाव टाळण्याचे आव्हान ऑस्ट्रेलियन संघासमोर होते. पण दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर यजमानांची डाळ शिजली नाही. कालच्या 4 बाद 169 धावांवरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचे फलंदाज ठरावीत अंतराने बाद होत गेले. एक बाजू लावून धरणारा उस्मान ख्वाजा (97) आणि पीटर नेव्हिल (60) यांचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे इतर फलंदाज खेळपट्टीवर फारकाळ टिकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 361 धावांवर संपुष्टात आला. दक्षिण आफ्रिकेकडून कागिसो रबाडाने पाच बळी टिपले. तर भारतीय वंशाचा गोलंदाज केशव महाराजने एक बळी टिपला. पदार्पणातच संघाला विजय मिळाल्याने महाराजचे पदार्पण संस्मरणीय ठरले.