ऑस्ट्रेलियाचा डाव संपला, भारत विजयाची गुढी उभारणार
By admin | Published: March 27, 2017 04:22 PM2017-03-27T16:22:24+5:302017-03-27T20:40:35+5:30
चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती
ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. 27 - चौथ्या कसोटीत दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाचा संघ 137 धावात ढेर झाला. भारताने पहिल्या डावात 332 धावा करत 32 धावांची आघाडी घेतली होती. भारताला विजयासाठी 106 धावांची लक्ष्य आहे. चार सामन्याची कसोटी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. चौथा कसोटी सामना जिंकून भारत विजयाची गुढी उभारणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारताकडे फलंदाजीसाठी अजून दोन दिवस बाकी आहेत. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने बिनबाद 19 धावा केल्या असून भारताला विजयासाठी अजून 87 धावांची आवश्यकता आहे
भारताने आज सुरुवातीपासूनच ऑस्ट्रेलियावर वर्चस्व गाजवले. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. वॉर्नर-रेनशॉ जोडीने संथ सुरुवात केली. पण भुवनेश्वर-यादव जोडीने कांगारुंची शिकार केली. या जोडीने योग्य टप्प्यावर मारा करत कांगारूंना बाद केले. उमेश यादवने वॉर्नर-रेनशॉ यांना बाद करत ऑस्ट्रेलियावर दबाव निर्माण केला. वॉर्नर 6 आणि रेनशो 8 धावांवर बाद झाला. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथही आज अपयशी ठरला. भुवनेश्वरने स्मिथच्या दांड्या वाकवत भारताला मोठं यश मिळवून दिले. पहिल्या डावात चार बळी घेणाऱ्या कुलदीपला दुसऱ्या डावात एकही बळी घेता आला नाही. भारताकडून यादव, जाडेजा आणि अश्विनने प्रत्येकी 3-3 असे बळी घेतले आहेत. तर भुवनेश्वर कुमारला एक विकेट मिळाली.
ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने 45 धावांची खेळी केली आहे. तर वेड 25 धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ 17 धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या पाच फलंदाजांना 10चा आकडाही पार करता आला नाही. कालच्या ६ बाद २४८ धावांवरून भारताने आज खेळाला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी नाबाद असलेल्या साहा-जाडेजाच्या जोडीने तिसऱ्या दिवशी आक्रमक खेळ केला. जाडेजाने चौफेर फटकेबाजी करताना 63 धावांची खेळी केली. या विस्फोटक खेळीदरम्यान त्याने चार चौकार आणि चार षटकार लगावले. जाडेजा बाद झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी भारतीची पडझड झाली आणि भारताचा डाव 332 धावांवर संपुष्टात आला. साहाने 31 धावांची संयमी फलंदाजी करताना जाडेजाला उत्तम साथ दिली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन लायने सर्वाधिक पाच बळी घेतले तर कमिन्सने 3 गडी बाद केले.