आॅस्ट्रेलियाचा धावांचा डोंगर
By admin | Published: December 11, 2015 12:26 AM2015-12-11T00:26:45+5:302015-12-11T00:26:45+5:30
अॅडम व्होजेस आणि शॉन मार्श यांच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध पहिल्याच दिवशी ३ बाद ४३८ धावांचा डोंगर उभारला.
होबार्ट : अॅडम व्होजेस आणि शॉन मार्श यांच्या धडाकेबाज शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने विंडीजविरुद्ध पहिल्याच दिवशी ३ बाद ४३८ धावांचा डोंगर उभारला. विंडीजविरुद्ध आॅस्ट्रेलियाची पहिल्या दिवशी ही सर्वोच्च खेळी आहे. व्होजेस १७४ आणि मार्श १३९ धावांवर नाबाद आहे. या दोघांनी चौथ्या गड्यासाठी नाबाद ३१७ धावा ठोकल्या.
व्होजेसने या मैदानावर आॅस्ट्रेलियासाठी वेगवान शतक साजरे केले. त्याने १०० चेंडूंत १०० धावांचा आकडा गाठून गिलख्रिस्टचा विक्रम मोडला. गिलख्रिस्टने पाकविरुद्ध ११० चेंडूंत शतक साजरे केले होते. व्होजेसचे हे तिसरे आणि विंडीजविरुद्ध दुसरे शतक होते. मार्शचेही हे तिसरे व आॅस्ट्रेलियातील पहिले शतक ठरले. उपहाराआधी विंडीजने आॅस्ट्रेलियाचे तिन्ही फलंदाज बाद केले. डेव्हिड वॉर्नर ६४, कर्णधार स्टीव्ह स्मिथ १० हे बाद झाल्यानंतर व्होजेस-मार्श यांनी खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली.
संक्षिप्त धावफलक : आॅस्ट्रेलिया पहिला डाव : ८९ षटकांत ३ बाद ४३८ (जेए बर्न्स ३३, डेव्हिड वॉर्नर ६४, अॅडम व्होगस १७४, शॉन मार्श १३९; गोलंदाजी : जेए वॅरीक्कन २/१११, एसटी गॅब्रियल १/५९).