आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

By admin | Published: February 22, 2016 03:48 AM2016-02-22T03:48:04+5:302016-02-22T03:48:04+5:30

ज्यो बर्न्स आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली.

Australia's strong position | आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत

Next

ख्राईस्टचर्च : ज्यो बर्न्स आणि स्टिव्हन स्मिथ यांच्या शतकी खेळीच्या बळावर आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी आपली स्थिती मजबूत केली.
बर्न्सने तिसरे कसोटी शतक झळकावताना आपल्या कारकिर्दीतील सर्वोच्च १७० धावांची खेळी केली, तर स्मिथने १४ वे शतक ठोकताना १३८ धावा केल्या. त्यामुळे आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंडच्या पहिल्या डावाच्या ३७० धावांच्या प्रत्युत्तरात ४ बाद ३६३ धावा करताना चोख उत्तर दिले. बर्न्स आणि स्मिथ यांनी तिसऱ्या गड्यासाठी २८९ धावांची भागीदारी केली. ही भागीदारी न्यूझीलंडविरुद्ध आॅस्ट्रेलियातर्फे विक्रमी ठरली. दिवसाचा खेळ संपला तेव्हा अ‍ॅडम व्होजेस २, तर नाथन लियोन ४ धावांवर खेळत होते.
बर्न्सने नील वेगनर (६३ धावांत २ गडी) याच्या उसळत्या चेंडूंचा पूर्ण दिवसभर यशस्वीपणे सामना केला; परंतु दिवसाचा खेळ संपण्यास २८ चेंडू बाकी असताना तो या वेगवान गोलंदाजाला पूल करण्याच्या प्रयत्नात स्क्वेअरलेगवर उभ्या असलेल्या मार्टिन गुप्टिलकडे झेल देऊन बसला. त्याने ३२१ चेंडूंत २० चौकार मारले. तत्पूर्वी बर्न्सला पंचांनी ३५ धावांवर खेळत असताना यष्टिपाठीमागे झेलबाद ठरवले होते; परंतु रेफरल घेतल्यानंतर त्याला नाबाद ठरवण्यात आले. चेंडू त्याच्या हाताला लागल्याचे स्पष्ट झाले होते. पाच चेंडूंनंतर स्मिथदेखील वेगनरच्या चेंडूवर गुप्टिलकडे झेल देऊन तंबूत परतला. स्मिथने २४१ चेंडूंत १४ चौकार मारले.(वृत्तसंस्था)

...आणि सर्वांचा
श्वास रोखला गेला
आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी स्टिव्हन स्मिथच्या हेल्मेटवर तेजतर्रार उसळता चेंडू आदळल्यानंतर सर्वच खेळाडू आणि प्रेक्षकांचा श्वास रोखला गेला होता. तथापि, त्यानंतर स्मिथने शानदार शतक झळकावले.
दुसऱ्या दिवशी चहापानाच्या ठीक आधी स्मिथ ७८ धावांवर फलंदाजी करीत असताना न्यूझीलंडचा तेजतर्रार गोलंदाज नील वेगनर याचा उसळता चेंडू स्मिथच्या हेल्मेटवर आदळला. त्यामुळे स्मिथ जमिनीवर पडला. त्यानंतर त्याच्यावर उपचार करण्यात आले आणि नंतर स्मिथने १३८ धावांची शानदार शतकी खेळी पूर्ण केली. १५ महिन्यांपूर्वी अशाच प्रकारे डोक्यावर उसळता चेंडू आदळल्याने आॅस्ट्रेलियन सलामीवीर फिलिप ह्यूजचे निधन झाले होते. त्या घटनेची पुन्हा आठवण आजच्या वेगनरच्या उसळत्या चेंडूमुळे झाली.

संक्षिप्त धावफलक :
पहिला डाव ३७०.
आॅस्ट्रेलिया (पहिला डाव) : ४ बाद ३६३; (ज्यो बर्न्स १७०, स्टिव्हन
स्मिथ १३८, नील वेगनर २/६३, ट्रेंट बोल्ट २/८५).

Web Title: Australia's strong position

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.