आॅस्ट्रेलियाचा दमदार मालिका विजय
By admin | Published: September 10, 2016 03:46 AM2016-09-10T03:46:28+5:302016-09-10T03:46:28+5:30
मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले.
कोलोंबो : गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर पुन्हा एकदा धडाकेबाज ग्लेन मॅक्सवेल याने केलेल्या धुवाधार फलंदाजीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने दुसऱ्या व अंतिम टी२० सामन्यात श्रीलंकेला चार विकेट्सने नमवले. यासह आॅस्टे्रलियाने टी२० मालिकेत २-० असे निर्विवाद वर्चस्व राखले. विशेष म्हणजे, कारकिर्दीतील अखेरचा सामना खेळत असलेल्या तिलकरत्ने दिलशानला विजयी निरोप देण्यात श्रीलंका संघ अपयशी ठरला.
गतसामन्यात विक्रमी नाबाद शतक झळकावणाऱ्या मॅक्सवेलने पुन्हा एकदा आपला हिसका दाखवताना २९ चेंडूत ७ चौकार आणि चार षटकारांसह ६६ धावांची वेगवान खेळी केली. शिवाय कर्णधार डेव्हीड वॉर्नरनेही २४ चेंडूत २५ धावांची खेळी करुन मॅक्सवेलसह ९३ धावांची दमदार सलामी दिली. या दोघांच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दिलेले १२९ धावांचे लक्ष्य आॅस्टे्रलियाने १७.५ षटकात ६ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. या सामन्यातही मॅक्सवेलने विक्रमी खेळी करताना १८ चेंडूत अर्धशतक पुर्ण करुन आॅस्टे्रलियाकडून वेगवान अर्धशतक झळकावले. विशेष म्हणजे त्याने गेल्या सामन्यातील स्वत:चाच १९ चेंडूत अर्धशतकाचा विक्रमही मागे टाकला. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक :
श्रीलंका : २० षटकात ९ बाद १२८ धावा (धनंजय डिसिल्व्हा ६२, कुसल परेरा २२; अॅडम झम्पा ३/१६, जेम्स फॉल्कनर ३/१९) पराभूत वि. आॅस्टे्रलिया : १७.५ षटकात ६ बाद १३० धावा (ग्लेन मॅक्सवेल ६६, डेव्हीड वॉर्नर २५; तिलकरत्ने दिलशान २/८)