ऑस्ट्रेलियाला तिसरा धक्का, रेनशॉ पाठोपाठ मार्श स्वस्तात बाद
By admin | Published: March 16, 2017 10:42 AM2017-03-16T10:42:23+5:302017-03-16T11:19:32+5:30
रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
रांची, दि. 16 - रेनशॉ पाठोपाठ शॉन मार्शही स्वस्तात माघारी परतला आहे. मार्शला अवघ्या (2) धावांवर अश्विनने पूजाराकरवी झेलबाद केले. ऑस्ट्रेलियाची अवस्था 3 बाद 89 झाली आहे. सलामीवीर मॅट रेन शॉ (44) धावांवर बाद झाला. 80 धावांवर ऑस्ट्रेलियाची दुसरी विकेट गेली. उमेश यादवच्या गोलंदाजीवर रेन शॉ ने स्लीपमध्ये उभ्या असलेल्या कर्णधार विराट कोहलीकडे सोपा झेल दिला. आता कर्णधार स्मिथची (15) साथ द्यायला हँडस्काँब मैदानावर आला आहे. सलामीवीर डेविड वॉर्नरला डावखुरा फिरकी गोलंदाज रविंद्र जाडेजाने आपल्याच गोलंदाजीवर झेलबाद केले. त्याने (19) धावा केल्या. 50 धावांवर ऑस्ट्रेलियाची पहिली विकेट गेली.
रांचीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरु आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत आहेत. पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने तर दुसरी कसोटी भारताने जिंकली होती. दुस-या कसोटीत ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने पंचांच्या निर्णयावर डीआरएस घेताना पॅव्हेलियनकडे मदत मागितल्याचे प्रकरण बरेच गाजले.
कर्णधार विराट कोहलीने या प्रकारावर जोरदार टीका केल्याने दोन्ही संघांमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे तिस-या कसोटीत खेळताना दोन्ही संघात ठसन दिसू शकते. कसोटी मालिकेत खेळपट्टी रोमांच निर्माण करीत आहे.पुण्यातील पहिल्या कसोटीसाठी असलेली खेळपट्टी खराब, तर बंगळुरूमधील दुसऱ्या कसोटीची खेळपट्टीदेखील साधारण असल्याचा निष्कर्ष मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी काढला होता.
बंगळुरूत भारताने माघारल्यानंतरही मुसंडी मारून विजय साकार केल्याने आत्मविश्वास उंचावला. तिसऱ्या सामन्याच्या निमित्ताने दोन्ही संघांच्या चिंतेचा विषय खेळपट्टी आहे. ही खळपट्टी फिरकीला अनुकूल मानली जाते; पण स्थानिक अधिकाऱ्यांनी मात्र पाच दिवस एकसारखेच स्वरूप राहील, असे भाकीत केले.
मालिकेवर लक्ष केंद्रित करणार : कोहली
बंगळुरूत जे झाले, ते विसरून आता क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. बरेच क्रिकेट शिल्लक असल्याने कटुता ठेवता येणार नाही. आमचे क्रिकेटला प्राधान्य असेल. प्रतिस्पर्धी खेळाडूंनी मला काय म्हटले, त्याबद्दल खेद नाही. आता पुढे पाहायचेय. मी जे बोलतो, त्याबद्दलच विचार करतो. सामन्यादरम्यान बराच ब्रेक मिळाल्याने एकाच मुद्द्यावर वेळ घालविण्यापेक्षा पुढचा विचार कधीही चांगलाच. आयसीसीच्या हस्तक्षेपानंतर वादावर दोन्ही बोर्डांनी चांगली भूमिका घेतल्याचा आनंद आहे. मला टार्गेट करण्यात आले, त्यावर काहीच बोलायचे नाही. टीकेचे लक्ष्य होण्याचे टाळून कुणीही १५-१६ वर्षे क्रिकेट खेळू शकत नाही. ही मालिका मात्र वैयक्तिक स्पर्धा करण्याची नाहीच. आम्ही प्रतिस्पर्धी खेळाडूच्या तुलनेत प्रतिस्पर्धी संघाच्या कामगिरीवर लक्ष ठेवून डावपेच आखतो.