आॅस्ट्रेलियाचा बांगलादेश दौरा रद्द?
By admin | Published: September 30, 2015 11:47 PM2015-09-30T23:47:28+5:302015-09-30T23:47:28+5:30
आॅस्ट्रेलिया-बांगलादेशदरम्यान संभाव्य दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर संशयाचे ढग कायम आहेत. आॅस्ट्रेलियाला सोमवारी दौऱ्यावर यायचे होते;
मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया-बांगलादेशदरम्यान संभाव्य दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेवर संशयाचे ढग कायम आहेत. आॅस्ट्रेलियाला सोमवारी दौऱ्यावर यायचे होते; पण त्यांचे खेळाडू तयारी शिबिरातून आपापल्या शहराकडे रवाना झाल्यामुळे दौरा रद्द झाल्याची शंका येत आहे.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर आॅस्ट्रेलियन सरकारने संघाच्या दौऱ्यास परवानगी दिलेली नाही. बांगलादेशची राजधानी ढाका येथे सोमवारी रात्री दहशतवादी हल्ला झाला. त्यात इटलीचा एक नागरिक मारला गेल्याने उभय देशांमधील मालिकेवर धोक्याचे संकट घोंघावू लागले होते.
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेने इटलीच्या नागरिकाची हत्या केली, त्याचवेळी आॅस्ट्रेलियाचे क्रिकेट अधिकारी बांगलादेशात सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेत होते. सीएच्या या सुरक्षा पथकाने आपला अहवाल दिला असून, हा दौरा रद्द होण्याची दाट शंका आहे. त्याआधी आॅस्ट्रेलियाचे विदेश मंत्रालय, व्यापार मंत्रालय आणि राष्ट्रीय सुरक्षा परिषदेने क्रिकेट बोर्डाला सूचना देत दहशतवादी आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूंना टार्गेट करू शकतात, अशी शंका वर्तविली होती.