मैदानाबाहेर ऑस्ट्रेलियाचा 'विराट' माइंडगेम
By Admin | Published: March 13, 2017 07:22 AM2017-03-13T07:22:59+5:302017-03-13T07:22:59+5:30
भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने वेळ पडल्यास स्लेजिंगही करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
नामदेव कुंभार/ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 13 - पुण्यातील पहिल्या कसोटीत 333 धावांच्या मानहाणीकारक पराभवानंतर बंगळुरू कसोटीत सनसनाटी विजय मिळवत भारताच्या विराटसेनेने मालिकेत दमदार पुनरागमन केले आहे. दुसऱ्या कसोटीत डीआरएस विवादाप्रकरणी आयसीसीने कानाडोळा करत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांच्यापैकी कुणावरही कारवाई केली नाही. पण मैदानावर शेरेबाजी, शिवीगाळ, पाणउतारा करणे वगैरे गोष्टी ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंना नविन नाहित. ही कदाचित त्यांची जननीच असावी असे मला वाटतं. या आधी इंग्लंडचा माजी कर्णधार इयान बॉथम आणि ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टिरक्षक रॉर्डनी मार्शने, टॉनी ग्रेग-सुनिल गावस्कर, स्टीव्ह वॉ-गांगुली आणि हरभजन- सायमंडस अशी अनेक प्रकरणे प्रसिद्ध आहेत. 2008 मध्ये झालेल्या मंकी गेट प्रकरणाने तर क्रिकेट विश्वात धुमाकूळ घातला होता.
सुरुवातीपासून ऑस्ट्रेलियन संघ मैदानावर आणि मैदाना बाहेरही माईंडगेम खेळण्यात पटाईत आहे. भारत दौऱ्यावर येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने वेळ पडल्यास स्लेजिंगही करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतील वादंग अपेक्षितच होता म्हटले तर वावग वाटायला नको. दुसऱ्या कसोटीतील डीआरएस वादावर आयसीसीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपली खुरापत काढण्यास सुरु केली आहे. यावेळी खेळाडू फक्त नविन आहे.
काल माध्यमांशी बोलताना ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने भारतीय कर्णधार विराट कोहलीला लक्ष्य केले. पुणे आणि बंगळूरु कसोटीत विराट कोहलीला धावा न करता आल्यानं तणावात असल्याचं म्हटलं आहे. धावा न करता आल्यानं विराटचं मैदानावरील वर्तन बिघडत चालल्याचा जावईशोधही जॉन्सननं लावला आहे. विराट कोहली बेंगळुरू कसोटीमध्ये आपल्या जुन्या रणनीतीचा वापर करीत होता. तो उत्साही आहे, पण सध्या त्याच्या धावा होत नसल्यामुळे निराश झाला आहे. असा अजब तर्कट काढतं नव्या वादाला तोंड फोडले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या एका माजी फलंदाजाने यामध्ये उडी घेत खेळपट्टयावर प्रश्न उपस्थित केला आहे. पहिल्या आणि दुसऱ्या कसोटीतील खेळपट्टी दुय्यम दर्जाजाची असल्याची टीका मॅथ्यू हेडनने केली आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉने स्टीव्ह स्मिथ एक प्रतिष्ठित खेळाडू असून त्याच्या शब्दांवर विश्वास ठेवला पाहिजे असं म्हटलं आहे. स्टीव्ह स्मिथने डीआरएसच्या निर्णयावर रेफरल मागण्याआधी ड्रेसिंग रूमकडे पाहणं आपली चुकून पाहिल्याचं सांगितलं आहे. तसंच ती आपली घोडचूक असल्याचंही कबूल केलं आहे.
म्हणजे झालं असे, पहिल्यांदा घोडचूक करायची आणि पुन्हा ती केल्य़ाचे मान्य करत माफी मागून मोकळ व्हायचं, म्हणजे कारवाई होणार नाही, आणि जरी कारवाई झाली तरी चूक मान्य केल्यामुळे फक्त सामन्यातील मानधान कापले जाण्याची शक्यता राहते. ऑस्ट्रेलियाच्या वर्तमान पत्राने तर हद्दच केली, प्रशिक्षक अनिल कुंबळे आणि विराट कोहलीला सरळ लक्ष करताना गंभीर प्रकारचे आरोप केले.
कोहलीला पायचित दिल्यानंतर कुंबळे रागाच्या भरात पंचांच्या रुममध्ये गेला आणि विराटला बाद का दिले, याबाबत स्पष्टीकरण मागितले, तर मॅच संपल्यानंतर कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांवर शीतपेयाची बाटली फेकली. त्यामध्ये एक अधिकारी जखमी झाला, असा आरोप करण्यात आला आहे. मैदानावर क्रिकेट खेळताना शांत आणि संयमी असणाऱ्या अनिल कुंबळेवर जाणूनबुजून सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे बीसीसीआयने हे प्रकरण आयसीसीकडे नेले. असा आरोप करण्यात आला.
दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन करणाऱ्या भारतीय संघातील खेळाडू बाबत मैदानाबाहेर टीकी टिपण्णी करत मानसिक संतुलन बिघडवण्याच काम काही माजी खेळाडू करत असल्याचे दिसून येतं आहे. मालिकेत 1-1 अशी बरोबरीत आली आसली तरी भारत मालिकेत पुढे आहे. एखादा संघ पराभवातून धडा घेत जिंकतो तेव्हा त्यांचा आत्मविश्वासही द्विगुणित झालेला असतो. ही ऐतिहासिक मालिका जिंकण्याची संधी आॅस्ट्रेलियाला बंगळुरूमध्येच होती. पण त्यांनी ती गमविल्याने पुढील दोन सामन्यांत विजय मिळविणे सोपे जाणार नाही.
कोहलीने धावा काढल्या नसल्या तरी भारताने फलंदाजीचा दम दाखविला आहे. रांचीत कोहलीचेही योगदान राहिले तर भारताला रोखणे ऑस्ट्रेलियासाठी एकूणच कठीण जाईल. भारताचा माजी कर्णधार सुनिल गावस्कर म्हणतो, कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं स्मिथसारखंच करावं. जशास तशे उत्तर द्यावे. म्हणजे, तोंड दाबून बुक्क्यांचा मारा अशी ऑस्ट्रेलियाची अवस्था होईल. याने प्रकरण अधिक चिघळेल हे मान्य, पण आयसीसी आमि ऑस्ट्रेलियन क्रिकेट यांना आरसा दाखवल्यासारखं होईल. अर्थात, या बोलण्याच्या गोष्टी झाल्या. खरोखरच असं कोणी करीत नसतं. विराट कोहली करूही शकतो म्हणा. तो आहे गरम डोक्याचा व उसळत्या रक्ताचा.