विराट कोहलीविरुद्ध ‘स्लेजिंग’ टाळा
By Admin | Published: February 4, 2017 12:51 AM2017-02-04T00:51:42+5:302017-02-04T00:51:42+5:30
भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत विराट कोहली ‘दुश्मन नंबर एक’असला तरी स्टीव्ह स्मिथ अँड कंपनीने भारतीय कर्णधाराविरुद्ध स्लेजिंग टाळावे,
मेलबोर्न : भारताविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत विराट कोहली ‘दुश्मन नंबर एक’असला तरी स्टीव्ह स्मिथ अँड कंपनीने भारतीय कर्णधाराविरुद्ध स्लेजिंग टाळावे, असा सल्ला आॅस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मायकल हसीने टीम आॅस्ट्रेलियाला दिल्ला आहे.
उपखंडात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या आॅस्ट्रेलियन फलंदाजांपैकी एक असलेल्या हसीने कोहलीविरुद्ध स्लेजिंगचा उलटा प्रभाव पडण्याची शक्यता असल्याचे म्हटले आहे. हसी म्हणाला, आॅस्ट्रेलियाने त्याला झटपट माघारी परतवण्याच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करायला हवे.
हसी पुढे म्हणाला,‘टीम आॅस्ट्रेलियाचा विचार करता कोहली त्यांच्यासाठी ‘दुश्मन नंबर १’ असेल आणि त्याला झटपट बाद करणे आवश्यक आहे. त्याच्याविरुद्ध स्लेजिंग केले तर तो चांगली कामगिरी करतो. त्याला तसे आव्हान आवडते.’
चार वर्षांपूर्वी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या या फलंदाजाने सांगितले की,‘आॅस्ट्रेलियाने योग्य रणनीती तयार करून त्याची अंमलबजावणी करावी. भावनेच्या भरात एकाग्रता भंग होते. त्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. स्लेजिंगच्या माध्यमातून मालिकेचा निर्णय निश्चित होणार असून कुणी आपल्या रणनीतीचा योग्य पद्धतीने वापर केला यावरच मालिकेचा निकाल निश्चित होईल.’ हसी पुढे म्हणाला, कोहली व स्मिथ यांच्यादरम्यानची वैयक्तिक स्पर्धा निर्णायक ठरले. सध्या कोहलीचा आत्मविश्वास उंचावलेला असून तो मायदेशात खेळत आहे.’ (वृत्तसंस्था)