पद्माकर शिवलकरांना पुरस्कार प्रदान
By admin | Published: March 10, 2017 06:22 AM2017-03-10T06:22:02+5:302017-03-10T06:22:02+5:30
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्विन यांना २०१५-१६ मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय
बंगळुरु : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि स्टार फिरकी गोलंदाक रविचंद्रन आश्विन यांना २०१५-१६ मोसमातील शानदार कामगिरीच्या प्रदर्शनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सर्वोत्कृष्ट पुरस्काराने गौरविले. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय खेळाडूसाठी पॉली उम्रीगर पुरस्कार कोहलीला प्रदान करण्यात आला.
या वेळी माजी दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांना भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या हस्ते सी. के. नायडू जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
विशेष म्हणजे, कोहलीने तिसऱ्यांदा या पुरस्कारावर नाव कोरले असून, अशी कामगिरी करणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. त्याचबरोबर गेल्यावर्षी वेस्ट इंडिज दौऱ्यात केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर आश्विनने प्रतिष्ठेचा दिलीप सरदेसाई पुरस्कार पटकावला. सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळवल्यानंतर कोहली म्हणाला की, ‘मी सुरुवातीपासूनच सर्वोत्तम क्रिकेटपटू बनण्याच्या प्रयत्नात होतो. यासाठी क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल, याची मला जाणीव होती. यासाठी तिन्ही क्रिकेटसाठी उपलब्ध राहणे आणि देशाच्या संघाला पुढे नेणे महत्त्वपूर्ण ठरले आहे.’
दरम्यान, या वेळी कोहलीने आपल्या टीकाकारांनाही गप्प केले. त्याने म्हटले की, ‘माझ्या कारकिर्दीमध्ये अनेक व्यक्ती अशा होते, ज्यांना माझ्या क्षमतेवर शंका होती. इतकेच नाही, तर आताही माझ्या कामगिरीवर शंका घेणाऱ्यांची आणि माझा विरोध करण्याऱ्यांची संख्या कमी नाही. पण, असे असले तरी एक गोष्ट नक्की आहे की, मला माझ्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता आणि आहे.’(वृत्तसंस्था)
मुंबईकडून रहाणेने स्वीकारला पुरस्कार
गेल्यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये वर्चस्व राखलेल्या आणि विक्रमी ४१व्यांदा रणजी स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या मुंबई क्रिकेट संघटनेला (एमसीए) सर्वोत्कृष्ट राज्य संघटनेच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या वेळी भारताचा भरवशाचा फलंदाज आणि मुंबईकर खेळाडू अजिंक्य रहाणे याने एमसीएच्या वतीने हा पुरस्कार माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदी यांच्याहस्ते स्वीकारला.
मुंबई, महाराष्ट्राची छाप
देशांतर्गत क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा काढणाऱ्या मुंबईच्या श्रेयस अय्यरला रणजी स्पर्धेत सर्वाधिक धावा काढल्याबद्दल माधवराव शिंदे चषक प्रदान करण्यात आला.
मुंबईचा सलामीवीर जय बिस्त यालाही २३वर्षांखालील सीके नायडू स्पर्धेत सर्वाधिक धावा काढण्यासाठी एम. ए. चिदंबरम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्राचा गोलंदाज सत्यजित बच्चाव याने २३ वर्षांखालील सीके नायडू सर्वाधिक बळी घेत एम. ए. चिदंबरम चषक पटकावला.