आझाद, बेदी यांच्यावर मानहानीचा दावा दाखल
By admin | Published: December 25, 2015 02:56 AM2015-12-25T02:56:45+5:302015-12-25T02:56:45+5:30
Next
>नवी दिल्ली : दिल्ली व जिल्हा संघटनेत (डीडीसीए) भारताचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षातून निलंबित केलेले खासदार कीर्ती आझाद यांच्यासह बिशनसिंग बेदी व सुरेंद्र खन्ना यांच्यावर पटियाला हाऊस न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीचा १६ व १९ वर्षांखालील वयोगटातील खेळाडू हिंमत सिंह याचे वडील तेजविर सिंह यांनी हा दावा दाखल केला आहे. खन्ना यांनी एका टीव्ही चॅनेलवरील चर्चासत्रात बेदी व आझाद यांच्या उपस्थितीत सिंह यांनी त्यांच्या मुलाला संघात स्थान मिळवून देण्यासाठी २५ लाख रुपयांची लाच दिल्याचा आरोप केला होता. या आरोपामुळे माझ्या कुटुंबाची व मुलाची प्रतिमा खराब झाल्याने न्यायालयात दावा दाखल केल्याचे सिंह यांनी सांगितले. माझा मुलगा वशिल्याने नव्हे तर त्याच्यातील गुणवत्तेमुळे निवडला गेला आहे. त्यामुळे अशाप्रकारचे निराधार आरोप करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया सिंह यांनी दिली.