अझहर महमूदची कॅलिसकडून पाठराखण
By admin | Published: May 18, 2015 03:26 AM2015-05-18T03:26:57+5:302015-05-18T03:26:57+5:30
राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात अझहर महमूदला अंतिम संघात स्थान देण्याच्या निर्णयाची कोलकाता नाईट
मुंबई : राजस्थान रॉयल्सविरुद्ध अखेरच्या साखळी सामन्यात अझहर महमूदला अंतिम संघात स्थान देण्याच्या निर्णयाची कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर जॅक कॅलिसने पाठराखण केली. नाईट रायडर्सला शनिवारी खेळल्या गेलेल्या या लढतीत पराभव स्वीकारावा लागला.
पत्रकार परिषदेत बोलताना कॅलिस म्हणाला, ‘हा कठीण निर्णय होता. खेळपट्टीवर हिरवळ असल्यामुळे वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची आशा होती. फिरकीपटूंसाठी ही खेळपट्टी अनुकूल ठरण्याची शक्यता नव्हती. महमुदच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीसाठी पर्याय मिळेल आणि फलंदाजी अधिक बळकट होईल, असा आम्ही विचार केला होता. अखेर ही खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल ठरली.’
राजस्थान रॉयल्सने दिलेल्या २०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना केकेआर संघाला ९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे केकेआर संघ प्ले आॅफच्या शर्यतीतून जवळजवळ बाहेर फेकला गेला. या विजयामुळे २००८ मध्ये जेतेपद पटकावणाऱ्या राजस्थान रॉयल्सने १४ सामन्यांत १६ गुणांची कमाई करीत प्ले आॅफमध्ये स्थान निश्चित केले. पाकिस्तानमध्ये जन्मलेला व सध्या इंग्लंडमध्ये स्थायिक असलेल्या महमुदला पहिल्या १३ लढतींमध्ये संधी मिळाली नाही. महमुदचा फिरकीपटू सुनील नरेनच्या स्थानी संघात समावेश करण्यात आला, पण गोलंदाजीमध्ये तो महागडा ठरला. त्याने तीन षटकांत ४१ धावा बहाल केल्या. तो फलंदाजीमध्येही अपयशी ठरला. आयपीएलच्या आठव्या पर्वात केकेआर संघाला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आले, असे कॅलिसने कबूल केले. (वृत्तसंस्था)