अझहरुद्दीनचा उमेदवारी अर्ज रद्द
By admin | Published: January 15, 2017 04:30 AM2017-01-15T04:30:21+5:302017-01-15T04:30:21+5:30
माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला नामांकन अर्ज निर्वाचन अधिकारी राजीव रेड्डी यांनी रद्द केला. बीसीसीआयने
हैदराबाद : माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याने हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदासाठी दाखल केलेला नामांकन अर्ज निर्वाचन अधिकारी राजीव रेड्डी यांनी रद्द केला. बीसीसीआयने अझहरवर लावलेली मॅच फिक्सिंगची बंदी हटविली की नाही, हे निश्चित नसल्याने शिवाय अझहर एचसीएचा मतदार आहे का, याविषयी शंका असल्यामुळे अर्ज रद्द करण्यात आला.
पीठासीन अधिकाऱ्यांनी बीसीसीआयला पत्र लिहून मॅच फिक्सिंगप्रकरणी बरी करण्यात आले काय अशी विचारणा केली. बीसीसीआयने मात्र कुठलेही उत्तर दिलेले नाही. सूत्रांच्या मते पीठासीन अधिकाऱ्याने बीसीसीआयऐवजी लोढा समितीला पत्र लिहायला हवे होते. अझहरने नॅशनल क्रिकेट क्लबकडून अर्ज भरला होता.
कोर्टात दाद मागेन : अझहर
अझहरला नामांकन रद्द झाल्याबद्दल विचारणा करताच तो म्हणाला, ‘मी दु:खी आणि निराश आहे. न्यायालयाने सर्व आरोपातून माझी निर्दोष सुटका केली. माझ्याविरुद्ध कटकारस्थान शिजलेले दिसते. गरज भासल्यास कोर्टाची मदत घ्यावी लागेल. अर्जाबाबत निर्वाचन अधिकाऱ्यांना मी सर्व माहिती पुरविलेली आहे. तरीही अर्ज रद्द झाल्याने घोर निराशा झाली. त्यामागील कारण हवे आहे. कारण कळल्यास मो कोर्टात दाद मागू शकेन. मला तर अर्ज देखील मिळालेला नव्हता. तो मी बीसीसीआयकडून प्राप्त केला, असे अझहरने सांगितले.
एचसीएच्या निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांची यादी उप्पल स्टेडियमवर प्रकाशित करण्यात आली. त्यात जी. विवेकानंद आणि विद्युत जयसिम्हा हे दोन उमेदवार अध्यक्षपदाच्या रिंगणात शिल्लक आहेत. निवडणूक १७ जानेवारीला होईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर लोढा पॅनलच्या शिफारशीनुसार अर्शद अय्युब यांनी पद सोडताच अध्यक्षपद रिक्त होते. १९९२ पासून सलग तीन विश्वचषकात भारताचे नेतृत्व करणाऱ्या अझहरवर २०००मध्ये मॅच फिक्सिंग प्रकरणात आजीवन बंदी घालण्यात आली. याप्रकरणी लांबलचक लढाई लढल्यानंतर अझहरला आंध्र न्यायालयाकडून दिलासा लाभला होता. तथापि बीसीसीआयने अधिकृतरीत्या त्याच्यावरील बंदी उठविलेली नाही. अझहर म्हणाला,‘अध्यक्षपदाच्या रिंगणात असलेले जी. विवेकानंद हे सत्ताधारी टीआरएस सरकारमध्ये कॅबिनेटपदावर आहेत. हे लोढा समितीच्या शिफारशींविरुद्ध असल्यानंतरही त्यांचा उमेदवारी अर्ज कायम आहे. विवेकानंद हे माजी खासदार असून सध्या ते टीआरएस सरकारमध्ये आंतरराज्य संबंधांचे शासकीय सल्लागार म्हणून काम पाहात आहेत. (वृत्तसंस्था)
(वृत्तसंस्था)