अझलन शहा कप हॉकी : ब्रिटनने भारताला रोखले बरोबरीत
By admin | Published: April 29, 2017 06:30 PM2017-04-29T18:30:18+5:302017-04-29T18:31:35+5:30
6 व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत शनिवारी भारत आणि ग्रेट ब्रिटनमध्ये झालेला सलामीचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला.
Next
ऑनलाइन लोकमत
इपोह, दि. 29 - 26 व्या सुलतान अझलन शहा हॉकी स्पर्धेत शनिवारी भारत आणि ग्रेट ब्रिटनमध्ये झालेला सलामीचा सामना 2-2 असा बरोबरीत सुटला. भारताच्या आकाशदीप सिंहने 19 व्या मिनिटाला गोल करुन आघाडी घेतली. पण भारताचा हा आनंद फार काळ टिकला नाही. ब्रिटनच्या टॉम कारसनने 25 व्या मिनिटाला गोल करुन बरोबरी साधून दिली.
दुस-या सत्रात मनदीप सिंगने 48 व्या मिनिटाला दुसरा गोल केला. पण लगेचच 52 व्या मिनिटाला अॅलन फॉरसिथने गोल करुन ब्रिटनला बरोबरी साधून दिली. भारताने दोन्ही मैदानी गोल केले. यापूर्वी मागच्यावर्षी लंडनमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांमध्ये शेवटचा सामना झाला होता. हा सामना भारताने 2-1 असा जिंकला होता. पावसामुळे हा सामना ठरलेल्या वेळेपेक्षा दोन तास उशिराने सुरु झाला.
गतवर्षी भारतीय संघाने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवले होते. भारतीय संघ नऊवेळच्या विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाकडून पराभूत झाला होता. यावर्षी डिफेन्डर गुरिंदर सिंग आणि मिडफिल्डर सुमित व मनप्रीत सिंग हे नवे खेळाडू आहेत. भारतीय प्रशिक्षक रोलँट ओल्टमन्स यांनी सांगितले की, ‘हरमनप्रीतने वरिष्ठ स्तरावर ज्या पद्धतीने कामगिरी केली, ती सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आमच्या संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. युवा खेळाडू कोणत्याही दबावाखाली खेळणार नाहीत, यासाठी प्रयत्न केले जातील.
जागतिक मानांकनात सहाव्या क्रमांकावर असलेला भारतीय संघ हा अझलन शाह चषक स्पर्धेद्वारे मजबूत संघ तयार करण्याच्या उद्देशाने गेला आहे. लंडनमध्ये जूनमध्ये होणाऱ्या विश्व लीग उपांत्य सामन्यात हा संघ चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा आहे. ओल्टमन्स व इतर सहकारी हे खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत.
भारतीय संघ पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धेतही सहभागी होणार आहे. आशियाई स्पर्धेत विजेतेपद कायम राखल्यास २०२० साली होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताला स्थान मिळेल. वरिष्ठ खेळाडूंना याची जाण आहे. २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी संघ निवडण्याची तयारी सुरू असल्याचे त्यांना माहिती आहे.
अझलन शाह चषक स्पर्धेतील पाचवेळचा विजेता भारतीय संघ या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारत पहिला सामना ब्रिटनसोबत त्यानंतर 30 एप्रिलला न्यूझीलंड, २ मे रोजी ऑस्ट्रेलिया, ३ मे रोजी जपान आणि ५ मे रोजी यजमान मलेशिया संघासोबत सामना खेळेल. अंतिम, तिसऱ्या आणि पाचव्या स्थानासाठीचे सामने ६ मे रोजी खेळले जातील.