एकहजारी वादळ
By admin | Published: January 6, 2016 12:03 AM2016-01-06T00:03:02+5:302016-01-06T02:27:31+5:30
बहारदार खेळी करत सोमवारी ६५२ धावा ठोकून विक्रमी धावसंख्या रचणा-या प्रणव धनावडे याने मंगळवारी ३२७ चेंडूंत नाबाद एक हजार ०९ धावांचा डोंगर रचला.
कल्याण : बहारदार खेळी करत सोमवारी ६५२ धावा ठोकून विक्रमी धावसंख्या रचणा-या प्रणव धनावडे याने मंगळवारी ३२७ चेंडूंत नाबाद एक हजार ०९ धावांचा डोंगर रचला. तब्बल ११६ वर्षानंतर प्रणवने सर्वाधिक धावसंख्येचा जागतिक विक्रम मोडीत काढला असून या त्याच्या खेळीने संंघाला देखील १,४६५ धावांचे अजस्त्र आव्हान उभे करता आले.
कल्याणच्या पश्चिमेकडील वायलेनगर परिसरातील युनियन क्रिकेट अकादमीच्या ग्राऊंडवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एच. डी. भंडारी क्रिकेट कप स्पर्धेत १६ वर्षीय प्रणवने हा जागतिक विक्रम आपल्या नावावर नोंदवला. मैदानात सोमवारी तब्बल पाच तास ठाण मांडलेल्या प्रणवने १९९ चेंडुत नाबाद ६५२ धावा ठोकत या विक्रमाला गवसणी घातली होती. मंगळवारी सकाळी खेळ सुरू होताच तो हजार धावांचा पल्ला कधी गाठतो, याची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. त्याच्या सोमवारच्या तडाखेबंद खेळीची वार्ता सर्वदूर पसरल्याने क्रिकेटप्रेमींनी, विद्यार्थी- शिक्षकांनी मैदानात गर्दी केली होती. जसजशा त्याच्या धावांत पन्नास-शंभर धावांची भर पडत गेली, तसतसे मैदान आनंदाने टोकलेल्या आरोळ््या, प्रत्साहनाच्या घोषणांनी दमुदुमून गेले. त्याने एक हजार ०९ अशा नाबाद खेळीत तब्बल १२९ चौकार आणि ५९ षटकार मारले. चौकाराच्या साह्याने त्याने ५१६, तर षटकारातून ३५४ धावा केल्या.
त्याच्या या विक्रमाची माहिती जसजशी पसरत होती, तसतशी खेळाच्या मैदानावर राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी एकच गर्दी केली. काहींनी सोशल मीडियावरून शुभेच्छांचा वर्षाव केला. या वेळी अनेक प्रसारमाध्यमेही प्रणवच्या पालकांसह त्याच्या प्रशिक्षकांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी पुढे सरसावत होते. प्रणवला या जागतिक विक्रमामुळे आर्थिक मदतीचा हातभारही मिळाला आहे. या विक्रमाबाबत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यासह शालेय शिक्षण आणि क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी दूरध्वनीवर प्रणवचे वडील प्रशांत धनावडे यांचे अभिनंदन केले. क्रिकेट आणि शिक्षणासाठीही प्रणवला भरीव मदत केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
>> अभिनंदन प्रणव! हजार धावांचा पल्ला गाठणारा तू पहिला खेळाडू ठरलास. खूप-खूप अभिनंदन आणि आणखी जोमात तयारी कर. तुला आणखी उंच शिखर गाठायचे आहे.- सचिन तेंडुलकर, टिष्ट्वटरवर
प्रणवची खेळी दुर्मिळ खेळीत मोडेल. इतकी मोठी धावसंख्या उभारणे कठीण असते. - महेंद्रसिंह धोनी, भारतीय
एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार
खूपच चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे (प्रणव धनावडे याने) कोणत्या प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळी केली, हे महत्त्वाचे नाही. त्याने उभारलेली धावसंख्या अविश्वसनीय आहे. भविष्यातील सचिन तेंडुलकर घडत आहे. - हरभजनसिंग, फिरकीपटू
गोलंजादी कशी होती..? स्पर्धेचा स्तर काय होता..? अशा गोष्टींची चर्चा आत्ता गौण आहे. एखादा खेळाडू १,००९ धावांची खेळी करतो, हीच गोष्ट बुचकळ्यात टाकणारी आहे. - संजय मांजरेकर
अफलातून फलंदाजी
अजिंक्य रहाणे
एका सामन्यात वैयक्तिक हजार धावा करणे नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे. एक मुंबईकर म्हणून मला प्रणवचा अभिमान आहे. त्याने केलेल्या धावा उच्चारतानाही दम लागतो. यावरुनच त्याच्या खेळीची कल्पना येते. कोणत्याही सामन्यात खेळपट्टीवर टीकून राहणे महत्त्वाचे असते. प्रणवने आपल्या खेळीतून संयम आणि आक्रमणाचा संयम साधताना अफलातून खेळी केली. त्याचा स्टॅमिना जबरदस्त आहे. असा खेळत राहिला तर भविष्यात त्याच्यासह खेळण्याचा आम्हाला आनंद वाटेल. फलंदाज ज्या धावा एका मोसमात करतात त्या त्याने एका डावात केल्या आहेत. खरंच अफलातून फलंदाजी.
प्रशिक्षकांच्या डोळयात आनंदाश्रू : प्रणवच्या रूपाने पंचवीस वर्षांनी हे यश माझ्या पदरात पडले आहे. त्याच्यात खरंच टॅलेंट आहे. १४ वर्षाचा असतानासुध्दा तो सहजपणे षटकार ठोकायचा, हे त्याचे वैशिष्टय होते. विश्वविक्रम करून त्याने कमालच केली असून त्याची ही खरी सुरूवात म्हणायला हरकत नाही. दिलीप वेंगसरकर यांनाही या विक्रमामुळे आनंद झाला,’’ असे सांगताना प्रणवचे प्रशिक्षक मोबीन शेख यांच्या डोळयात आनंदाश्रू तरळले.
आम्हाला त्याचा अभिमान वाटतो! : के. सी. गांधी शाळेचा विद्यार्थी असलेल्या प्रणवचे शाळेचे शिक्षक आणि संस्थाचालकांकडुनही विशेष कौतुक करण्यात आले. आम्हाला प्रणवचा अभिमान वाटतो. पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्या विद्यार्थ्यांने यश संपादन केले आहे, अशा शब्दात संस्थेचे अध्यक्ष अशोक प्रधान यांनी कौतुक केले, तर शाळेने लावलेल्या रोपटयाचे आज प्रणवच्या रेकॉर्डने विशाल वृक्षात रूपांतर झाल्याची प्रतिक्रिया शाळेचे मुख्याध्यापक साईनाथ ढाकणे यांनी दिली.
संधीचे सोने केले : तुषार समाणी, अशोक जाधव आणि हरीश शर्मा या प्रणवच्या अन्य प्रशिक्षकांचा आनंदही गगनात मावेनासा झाला. शैलीबरोबरच चांगल्या फिटनेसमुळे प्रणवला विश्वविक्रमाला गवसणी घालणे शक्य झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. प्रणव चांगला यष्टीरक्षक आहे म्हणून तो प्रथम सातव्या क्रमांकावर खेळण्यासाठी यायचा आम्ही त्याचे गुण हेरले आणि त्याला वरच्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली. त्याने संधीचे सोने केले.
मेहनतीचे फळ त्याला मिळाले. माझी हौस मी मुलाकडून पूर्ण करून घेतोय. मी देखील क्रि केट खेळायचो, पण आम्हाला योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. हे स्वप्न प्रणव पूर्ण करतोय. त्याने कल्याण शहराचे नाव देशात नव्हे, जगात झळकविले आहे.
- प्रशांत धनावडे, प्रणवचे वडील
क्रिकेटजगतातील त्याचे धु्रव स्थान...
सिक्स... फोर... टाळ्या, शिट्या आणि जल्लोष असाच कल्ला.... पॅव्हेलीयनमधूनही ‘धनावडे, खेळत राहा’ असा सपोर्ट दिला जात होता... हे वातावरण होते कल्याणच्या वायलेनगरमधील युनियन क्रिकेट मैदानावर. जिथे प्रणव धनावडे याने हजार धावा केल्या. त्याचा जवळपास प्रत्येक बॉल बाउन्ड्री आणि मैदानाबाहेर जात होता आणि त्याच्या धावांच्या विक्रमाच्या बातम्या जसजशा पसरत गेल्या, तशी गर्दी वाढत होती.
मैदानात लोकप्रतिनिधी, प्रसारमाध्यमे यांची रांग लागली होती. प्रत्येक कॅमेरा प्रणवचेच छायाचित्र टिपत होता. ईनिंग ब्रेकमध्ये जो तो प्रणवची प्रतिक्रिया आणि त्याचे एक छायाचित्र टिपण्यासाठी धावत होता, याच दरम्यान प्रणववर देशभरातून कौतुकाचा वर्षाव सुरू होता.मैदानावर प्रणवसोबत सेल्फी काढण्याचा चान्स कोणीही सोडला नाही. यात त्याचे शाळकरी मित्रही मागे राहीले नाहीत. ‘राखीव चमकला’ अशा शब्दात त्याच्यावर त्यांनी कौतुकाचा वर्षाव केला.
प्रणवमय वातावरणात हजार धावांचा अचंबित करणारा पल्ला प्रणवने सहज गाठला आणि ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली. राजकीय पुढारी यात मागे नव्हते. शिवसेनेने लगेचच प्रणवला लाख रुपयांची मदत केली. गल्लीपासून दिल्लीपर्यंत केवळ एकच चर्चा रंगली ती म्हणजे प्रणवची. हजार धावांच्या या विक्रमामामुळे कल्याणसह प्रणवचे देखील नाव सुवर्णअक्षरात लिहिले गेले. ...