ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीकडून बबिता कुमारीचा 5-1नं पराभव
By admin | Published: August 18, 2016 07:32 PM2016-08-18T19:32:56+5:302016-08-18T23:34:13+5:30
महिला कुस्तीच्या 53 किलोग्राम फ्री स्टाइलच्या उपउपांत्यपूर्व फेरीत ग्रीसच्या मारिया प्रेवोलाराकीनं बबिता कुमारीला 5-1नं पराभवाची धूळ चारली आहे.
रिओ, दि. 18 - भारतीय मल्ल बबिता कुमारीला महिलांच्या ५३ किलो वजनगटात उपउपांत्यपूर्व फेरीत गुरुवारी युनानच्या मारिया प्रिवोलाराकीविरुद्ध गुणांच्या आधारावर १-५ ने पराभव स्वीकारावा लागला.या सोबतच भारताचे महिला कुस्तीतील आॅलिम्पिकचे आव्हान संपुष्टात आले.
साक्षी मलिकच्या ऐतिहासिक विजयानंतर सर्वांची नजर बबितावर केंद्रित झाली होती, पण ग्लास्गो राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्ण व विश्व चॅम्पियनशिपमधील कांस्यपदक विजेत्या भारतीय मल्ल बबिताची आक्रमक रणनीती यशस्वी ठरली नाही.
दोनदा आपल्याच डावामध्ये अडकल्यामुळे तिला ही लढत गमवावी लागली.
मारियाने चांगली सुरुवात केली. तिने बबिताला सुरुवातीलाच बाहेर करीत एक गुण वसूल केला. त्यानंतर २६ वर्षीय बबिताने चांगला प्रयत्न केला, पण तिला आपल्या डावाचा अचूक वापर करता आला नाही. मारियाने प्रत्युत्तर देतान दोन गुण वसूल करीत तीन मिनिटांनंतर पहिल्या फेरीत ३-० अशी आघाडी घेतली.
बबिता दुसऱ्या फेरीत वर्चस्व गाजवण्यास उत्सुक दिसली. तिही साक्षीप्रमाणे पुनरागमन करण्यास ओळखली जाते, पण युनानच्या मल्लाने तिला तशी संधी दिली नाही. बबिताने चांगला प्रयत्न केला, पण पुन्हा एकदा तिचा डाव तिच्यावरच उलटला. मारियाने दोन गुण वसूल करीत विजय निश्चित केला.
आता मारिया अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरली तर बबिताला रेपेचेज खेळण्याची संधी मिळेल. साक्षीने बुधवारी ५८ किलो वजन गटात रेपेचेजच्या आधारावर कांस्यपदक पटकावले होते