बच्चन कुटुंब रंगले खेळात!
By admin | Published: July 18, 2014 02:16 AM2014-07-18T02:16:03+5:302014-07-18T02:16:03+5:30
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची ओळख एकेकाळी ‘अँग्री यंग मॅन’ अशी होती. कुणी त्यांना मेगास्टार म्हणतात. अख्खे बच्चन कुटुंबीय क्रीडाचाहते आहे
नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चन यांची ओळख एकेकाळी ‘अँग्री यंग मॅन’ अशी होती. कुणी त्यांना मेगास्टार म्हणतात. अख्खे बच्चन कुटुंबीय क्रीडाचाहते आहे. खेळाचा आनंद लुटताना हे कुटुंब अगदी रमून जाते. छोट्या पडद्यावर अमिताभ आता ‘युद्ध’ या सिरियलद्वारे येत आहेत. ही सिरियल लाँच होण्याआधी अमिताभ यांनी ब्राझीलला जाऊन फिफा फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा आनंद लुटला.अमिताभ यांच्या पत्नी आणि राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांच्या चेहऱ्यावरील हास्य कुटुंबाच्या क्रीडाप्रेमाची साक्ष दर्शवीत होते. लोकमत मीडिया प्रा. लिमिटेडचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक खा. विजय दर्डा यांच्याशी गुरुवारी अनौपचारिक चर्चेच्या वेळी बच्चन कुटुंबाने काही अनुभव
शेअर केले. या वेळी जया बच्चन म्हणाल्या, की फुटबॉल आणि कबड्डी हे खेळ आमच्या कुटुंबात एकाच वेळी नांदतात. ‘अमिताभ नुकतेच विश्वचषकाचा अंतिम सामना पाहून परतले, तर पुत्र अभिषेक याने प्रो-कबड्डी लीगमधून जयपूर फ्रँचायझी संघ खरेदी केला,’ असे त्यांनी सांगितले.
७१ वर्षांच्या अमिताभ यांनी या विश्वचषकात ब्राझीलची जी दाणादाण झाली, त्याबद्दल टिष्ट्वटरवर नाराजीदेखील व्यक्त केली होती. आपला फेव्हरिट संघ इतका कसा कमकुवत खेळू शकतो, याबद्दल ते आश्चर्यचकित झाले. उपांत्य सामन्यात जर्मनीकडून एकतर्फी पराभव झाल्यानंतर ब्राझीलला तिसऱ्या स्थानाच्या लढतीत हॉलंडनेदेखील धूळ चारली होती. अमिताभ यांनी या पराभवाबद्दल टिष्ट्वट केले..., ‘‘कोपाकाबाना बीच फेस्टिव्हलमधून परतलो तर काय, ब्राझील पुन्हा
पराभूत झाला होता! मी कमालीचा नर्व्हस आणि उदास झालो! या संघाला अखेर झाले तरी काय, असा प्रश्न पडला!!’’ ब्राझीलच्या कमकुवत कामगिरीमागील कारणही अमिताभ यांनी शोधले.
ते म्हणतात, ‘ब्राझीलकडे एकाहून एक दिग्गज खेळाडू होते हे खरे असले तरी, सांघिक कामगिरीत ते अपयशी ठरले. वैयक्तिक कामगिरीत एकेक खेळाडू कितीही श्रेष्ठ असला तरी संघ म्हणून खेळताना कोचची गरज असते. एका माळेत बांधण्याची किमया कोचला करावीच लागते.’आता ज्युनियर बच्चन अर्थात अभिषेकने मनोगत व्यक्त करण्याची वेळ आली आहे. प्रो-कबड्डीचा थरार एकदा रंगात आला की, अभिषेकदेखील स्वत:चे मनोगत व्यक्त करणार!! (विशेष प्रतिनिधी)