टी-२०चा खेळावर वाईट परिणाम
By admin | Published: August 25, 2016 04:37 AM2016-08-25T04:37:47+5:302016-08-25T04:37:47+5:30
सध्या जगभरात विविध ठिकाणी टी२० क्रिकेटचा धडाका सुरु आहे.
चंदिगड : सध्या जगभरात विविध ठिकाणी टी२० क्रिकेटचा धडाका सुरु आहे. क्रिकेटच्या या वेगवान प्रारुपमधून क्रिकेटपटूंना लाखो-करोडो रुपयांची कमाई मिळत आहे. परंतु, यामुळे खेळावर वाईट परिणाम पडत आहे, असे स्पष्ट मत आॅस्टे्रलियाचे माजी दिग्गज वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्रा यांनी सांगितले.
पीसीए स्टेडियममध्ये २३ वर्षांखालील वेगवान गोलंदाजांच्या प्रशिक्षक केंद्राला भेट देण्यासाठी आलेल्या मॅकग्रा यांनी यावेळी आपले मत मांडले. ‘‘सध्या क्रिकेटपटू सातत्याने टी२० लीगकडे आकर्षित होत असून, यामुळे त्यांच्या खेळावर विपरीत परिणाम पडला आहे. ही परिस्थिती केवळ भारतापुरता मर्यादित नसून संपुर्ण जगामध्ये पाहायला मिळत आहे,’’ असे मॅकग्रा म्हणाले.
मॅकग्रा यांनी सांगितले, ‘‘भारतात सर्वात लोकप्रिय व यशस्वी आयपीएल होते. आॅस्टे्रलियामध्ये बिग बॅश लीग होते. तसेचे जगात इतर ठिकाणीही विविध टी२० लीग होतात. क्रिकेटपटूंना जेव्हा या स्पर्धांमध्ये यश मिळते, तेव्हा ते इतकी मेहनत घेत नाही, जेवढी या खेळासाठी आवश्यक असते.’’
‘‘खेळाडूंसाठी प्राथमिक बाब म्हणून पैसा कधीच नसावा. त्यांना खेळासाठी चांगला पैसा मिळतो याचा मला आनंद आहे. मात्र, युवा खेळाडू व खासकरुन वेगवान गोलंदाजांना अधिक मेहनत घेण्याची आवश्यकता आहे.,’’ असेही मॅकग्रा यांनी सांगितले. वेगवान गोलंदाजांबाबत मॅकग्रा म्हणाले की, ‘‘चांगला वेगवान गोलंदाज बनण्यासाठी खेळाडूला प्रत्येक परिस्थितीमध्ये खेळण्याची तयारी ठेवावी लागते. युवा खेळाडूंनी स्वत:हून ठरवावे की आपल्याला कोणत्या स्तराचा खेळाडू बनायचे आहे. त्यानुसारच त्यांचे भवितव्य अवलंबून असेल.’’ (वृत्तसंस्था)
>येणाऱ्या काळात युवा चमकतील
भारतामध्ये युवा गुणवत्तेची कमतरता अजिबात नाही. काही खेळाडू असे आहेत, जे येणाऱ्या काळामध्ये जगासमोर आपली प्रतिभा दाखवतील. माझ्यामते सध्या वीर प्रताप सिंग एक शानादार युवा गोलंदाज असून त्याचे प्रदर्शन असामान्य आहे. त्याच्याशिवाय, अंकित चौधरी, अंकित राजपूत आणि नाथु सिंग यांच्यासारखेही चांगले खेळाडू आहेत, जे पुढे आपल्या कामगिरीत आणखी सुधारणा करतील.- ग्लेन मॅकग्रा