‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2022 09:18 AM2022-07-06T09:18:08+5:302022-07-06T09:18:27+5:30

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते.

Badminton Asia Technical Committee apologises to PV Sindhu for 'human error' | ‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

‘बीएसी’ने मागितली पी. व्ही. सिंधूची माफी; रेफ्रीच्या चुकीच्या निर्णयाचा फटका

Next

नवी दिल्ली : यंदा एप्रिल महिन्यात झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेदरम्यान उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या चुकीमुळे बॅडमिंटन आशियाच्या (बीएसी) तांत्रिक समितीने भारताची स्टार शटलर पी. व्ही. सिंधू हिची माफी मागितली. बीएसी तांत्रिक समितीचे अध्यक्ष चिह शेन चेन यांनी, ‘त्या उपांत्य सामन्यात रेफ्रीद्वारे झालेल्या मानवी चुकीमुळे आम्ही सिंधूची माफी मागतो,’ असे सांगितले.

जपानच्या अकाने यामागुचीविरुद्ध झालेल्या उपांत्य सामन्यात पंचांकडून देण्यात आलेल्या चुकीच्या निर्णयानंतर सिंधूला अश्रू अनावर झाले होते. या निर्णयानंतर सिंधूने आपली लय गमावली आणि तिला पराभवानंतर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. चेन यांनी सिंधूसाठी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘दुर्दैवाने आता त्या निर्णयामध्ये बदल करता येणार नाही; पण अशा मानवी चुका पुन्हा होऊ न देण्यासाठी आम्ही आवश्यक पावले उचलली आहेत. तुम्हाला झालेल्या असुविधांसाठी आम्ही प्रामाणिकपणे आपली माफी मागतो. आमच्या मते हा खेळाचा एक भाग आहे आणि या प्रकरणाचा खिलाडू वृत्तीने स्वीकार केला गेला पाहिजे.’ पहिला गेम जिंकल्यानंतर सिंधू दुसऱ्या गेममध्ये १४-११ अशी आघाडीवर होती. मात्र, यानंतर पंचांनी अधिक वेळेचा ब्रेक घेतल्याचे सांगत सिंधूला दंड म्हणून यामागुचीला एक अतिरिक्त गुण बहाल केला. यानंतर सिंधूची लय बिघडली आणि तिला तीन गेमपर्यंत रंगलेल्या या सामन्यात २१-१३, १९-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला होता. यानंतर  सिंधूने पंचांच्या या निर्णयाची तक्रार करताना जागतिक संस्थेला आणि आशियाई बॅडमिंटन महासंघाला पत्र लिहिले होते.

Web Title: Badminton Asia Technical Committee apologises to PV Sindhu for 'human error'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.