बॅडमिंटनपटू सिंधूचे आता लक्ष्य ‘नंबर वन’चे...
By admin | Published: December 23, 2016 01:23 AM2016-12-23T01:23:38+5:302016-12-23T01:23:38+5:30
आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे
मुंबई : आॅलिम्पिकमध्ये यंदा मिळवलेले पदक माझ्यासाठी सर्वांत महत्त्वाचे यश होते. हे पदक मिळवून मी माझे एक स्वप्न पूर्ण केले आहे. त्याचबरोबर मी माझ्या पहिल्या सुपरसीरिज विजेतेपदाच्या प्रतीक्षेत होते आणि यंदा ती प्रतीक्षाही संपली. त्यामुळे हीच कामगिरी कायम ठेवून जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी येण्याचे लक्ष्य मी बाळगले आहे, असा विश्वास भारताची आॅलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू
पी. व्ही. सिंधू हिने व्यक्त केला.
मुंबईत गुरुवारी एका नामांकित जीवन विमा कंपनीने आयोजित केलेल्या ‘क्वेस्ट फॉर एक्सलेन्स’ कार्यक्रमामध्ये सिंधूने आपली प्रतिक्रिया दिली. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेल्ला गोपीचंद, किदाम्बी श्रीकांत, पी. कश्यप, समीर वर्मा, सात्विक साईराज, एचएस प्रणय, सिक्कि रेड्डी, गुरुसाई दत्त, सौरव वर्मा आणि भारतीय संघाचे फिजिओ किरण यांचीही उपस्थिती होती.
ताज्या जागतिक क्रमवारीनुसार सिंधूने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम स्थान मिळवताना ६ व्या क्रमांकावर कब्जा केला आहे. याविषयी ती म्हणाली, ‘मी या यशामुळे खूप आनंदीत आहे. भविष्यात नक्कीच अव्वलस्थान काबीज करण्याचे लक्ष्य आहे. यासाठी मी हळूहळू पुढे जाणार असून एकावेळी एक लक्ष्य साध्य करीन. यात नक्की यशस्वी होईन, अशी आशा आहे.’
यंदाचे वर्ष शानदार ठरल्याचे सांगताना सिंधू म्हणाली की, ‘नक्कीच, आॅलिम्पिक स्पर्धा चमकदार ठरली. याआधी अनेक जागतिक स्पर्धेत आपल्याला कांस्यपदकावरच समाधान मानावे लागले आहे. त्यामुळेच, यावेळी मला हा इतिहास कसंही करून बदलायचा होता. जपानच्या नोझोमी ओकुहारा (जपान) विरुद्ध यापूर्वी मी अनेकदा पराभूत झाले होते, पण यावेळी तिला सोडायचे नाही असा निर्धार करून सर्वोत्तम खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली.’
तसेच, ‘आॅलिम्पिकचा उपांत्य सामना सोपा नव्हता. मी पिछाडीवर होते. माझ्यापेक्षा गोपी सरांना त्या सामन्याची स्थिती चांगली कळत होती. त्यामुळे मी केवळ त्यांच्या सूचनांचे पालन करत गेले,’ असेही सिंधूने यावेळी म्हटले. नुकत्याच झालेल्या दुबई वर्ल्ड सुपरसीरिज फायनल्स स्पर्धेबाबत सिंधूने सांगितले की, ‘सुंग जी ह्यूनला नमवून मी चायना ओपनमध्ये बाजी मारली होती. परंतु, दुबईला ती अप्रतिम खेळली. शेवट जय-पराजय हा खेळाचा एक भाग असल्याने हे सर्व विसरुन मी पुढील कामगिरीवर लक्ष केंद्रित केले आहे.’ (क्रीडा प्रतिनिधी)