बॅडमिंटनपटू रितिकाने बर्लिनमध्ये सोडविला दहावीचा पेपर
By admin | Published: March 11, 2017 09:59 PM2017-03-11T21:59:57+5:302017-03-11T21:59:57+5:30
युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रितिका ठाकेर दहावीची विद्यार्थिनी आहे. स्थानिक सीडीएस शाळेची ती विद्यार्थिनी.
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 11 : युवा आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू रितिका ठाकेर दहावीची विद्यार्थिनी आहे. स्थानिक सीडीएस शाळेची ती विद्यार्थिनी. आयुष्याला वळण देणाऱ्या महत्त्वाच्या परीक्षेला मुकायचे नाही आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धादेखील खेळायच्याच, हा निर्धार तिने खरा करून दाखविला. वविविध शासकीय पातळीवरील समन्वय आणि रितिकाची मेहनत यामुळे जर्मनीच्या
बर्लिन शहरात दहावीचा पेपर सोडविण्याचे आव्हान रितिका आणि मुंबईतील मालाडच्या रायन इंटरनॅशनल स्कूलची रितिकाची सहकारी खेळाडू सिमरन सिंघी यांनी लीलया पेलले व यशस्वी केले. या दोघींनी पेपर सोडविल्यानंतर सामना खेळला, हे विशेष. शैक्षणिक सत्र वाचविल्याबद्दल तसेच महत्त्वाच्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व केल्याबद्दल दोन्ही खेळाडूंचे कौतुक होत
आहे.
डच तसेच जर्मन ओपन स्पर्धेसाठी रितिका व सिमरन यांची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. या दोघी क्रमश: दुहेरी आणि मिश्र दुहेरीसाठी संघात आहेत. दोघीही दहावीच्या विद्यार्थिनी असल्याने स्पर्धेच्या मध्येच परीक्षेचा अडथळा आला. १० मार्चला इंग्रजी भाषेचा पेपर होता. मुलीला परीक्षेला मुकावे लागू नये यासाठी रितिकाचे वडील राहुल यांनी सीडीएस स्कूल, नागपूर जिल्हा बॅडमिंटन संघटनेच्या माध्यमातून राज्य आणि राष्ट्रीय बॅडमिंटन संघटना आदींना त्यांनी विनंती केली. रितिका आणि सिमरन यांच्या शाळेच्या प्राचार्यांनी आयसीएसई बोर्डाला कळवून बर्लिनमध्ये दोन्ही विद्यार्थी पेपर सोडवू शकतील का, यावर मार्गदर्शन मागितले.
आयसीएई बोर्डाने सकारात्मक प्रतिसाद देत बर्लिनमध्ये पेपर सोडविण्याची परवानगी बहाल केली. बीएआय आणि क्रीडा मंत्रालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाशी संपर्क साधून बर्लिनमधील भारतीय दूतावासात या दोघींची पेपर सोडविण्यासाठी
व्यवस्था केली. दोन्ही विद्यार्थिनींनी पेपर सोडविल्यानंतर स्पर्धेत सामना देखील खेळला. पालक, क्रीडा पदाधिकारी, बोर्ड व शाळा प्रशासन , दूतावास आणि सरकार यांच्या सुंदर समन्वयातून साकार झालेल्या या कामाला यशस्वी केल्याचा आनंद दोन्ही विद्यार्थिंनीसह त्यांच्या पालकांच्या
चेहऱ्यांवर ओसंडून वाहत आहे.