बॅडमिंटनपटू के. श्रीकांत सर्वोत्कृष्ट दहा खेळाडूंमध्ये
By admin | Published: June 30, 2017 12:48 AM2017-06-30T00:48:11+5:302017-06-30T00:48:11+5:30
जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे.आधी इंडोनेशियन ओपन
नवी दिल्ली : जागतिक क्रमवारीत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत याने सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या यादीत झेप घेतली आहे.
आधी इंडोनेशियन ओपन आणि त्यानंतर आॅस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचे विजेतेपद मिळवल्यानंतर श्रीकांतच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. नुकत्याच जाहीर झालेल्या जागतिक क्र मवारीत श्रीकांतने सर्वोत्तम दहा खेळाडूंच्या यादीत प्रवेश केलाय. नवीन क्रमवारीनुसार किदाम्बी श्रीकांत आठव्या स्थानावर विराजमान आहे. गुंटूरच्या या २४ वर्षांच्या खेळाडूचे आता ५८,५८३ इतके गुण झाले. २०१५ साली श्रीकांत जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्र मांकावर होता. मात्र त्यानंतर श्रीकांतचा फॉर्म हरवल्यामुळे त्याची घसरण झाली. मात्र लागोपाठ दोन स्पर्धांमध्ये विजेतेपद मिळवित श्रीकांतने सर्वोत्तम खेळाडूंच्या यादीत पुन्हा एकदा धडाक्यात पुनरागमन केले आहे. श्रीकांतला आता अव्वल स्थानाचे वेध लागले आहेत. श्रीकांतसोबत आॅस्ट्रेलियन ओपनच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारणारा साईप्रणित १५ व्या तर अजय जयराम १६ व्या स्थानावर पोहचला आहे. मात्र एच. एस. प्रणय २३ व्या स्थानावर घसरला. याव्यतिरिक्त सायना नेहवालही जागतिक क्रमवारीत एका स्थानाने पुढे जात पाचव्या स्थानावर विराजमान झाली आहे.