विश्व कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय आव्हानाचे नेतृत्व बजरंगकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 06:53 AM2018-10-20T06:53:10+5:302018-10-20T06:53:22+5:30
बुडापेस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनिया हा शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद ...
बुडापेस्ट : आशियाई क्रीडा स्पर्धेचा सुवर्ण विजेता मल्ल बजरंग पुनिया हा शनिवारपासून येथे सुरू होत असलेल्या विश्व कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत ३० सदस्यीय भारतीय आव्हानाचे नेतृत्व करेल.
स्पर्धेत पुनिया स्वत: ६६ किलो वजन गटात जेतेपदाचा प्रबळ दावेदार आहे. २०१३ च्या विश्व स्पर्धेत त्याला कांस्यवर समाधान मानावे लागले होते. मागच्या महिन्यात खेलरत्न पुरस्कारातून वगळण्यात आल्यानंतरही बजरंगने नाराजी टाळून कठोर सराव केला. आता २०१३ च्या स्पर्धेतील पदकाचा रंग बदलण्याची त्याच्याकडे संधी असेल. राष्ट्रकुल तसेच आशियाई स्पर्धेत त्याने ज्या सहजतेने सुवर्ण पदके जिंकली तो अनुभव बघता त्याला येथे पदक मिळेल, असे मानले जात आहे. येथे रँकिंग मिळविणारा तो एकमेव भारतीय मल्ल असून रविवारी त्याची लढत होईल. ६५ किलो गटात २०१८ च्या युरोपियन चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता इलिया बेकबुलातोव याने माघार घेतली आहे.
अव्वल मानांकित तुर्कस्तानचा सेलाहट्टीन किलिचसालायान याच्या कामगिरीकडे देखील अनेकांच्या नजरा आहेत. महिला गटात स्टार मल्ल विनेश फोगाट (५० किलो) पदकाची प्रबळ दावेदार आहे. भारताने आतापर्यत विश्व चॅम्पियनशिपमध्ये केवळ सहा पदके जिंकली असून सुशील कुमार हा एकमेव सुवर्ण विजेता भारतीय मल्ल आहे. (वृत्तसंस्था)
भारतीय कुस्ती संघ
पुरुष फ्रीस्टाईल : संदीप तोमर (५७ किलो); सोनबा (६१ किलो); बजरंग पूनिया (६५ किलो); पंकज राणा (७० किलो); जितेंद्र (७५ किलो); सचिन राठी (७९ किलो); पवन (८६ किलो); दीपक राणा (९२ किलो); मोसम खत्री (९७ किलो); सुमित (१२५ किलो).
महिला फ्रीस्टाईल : विनेश फोगाट (५० किलो); पिंकी (५३ किलो); सीमा (५५ किलो); पूजा ढांडा (५७ किलो); संगीता (५९ किलो); साक्षी मलिक (६२ किलो); रितू (६५किलो); नवज्योत कौर (६८ किलो); रजनी (७२ किलो); किरण (७६ किलो).
पुरुष ग्रीको रोमन : विजय (५५ किलो); ज्ञानेंद्र (६० किलो); गौरव शर्मा (६३ किलो); मनीष (६७ किलो); कुलदीप मलिक (७२ किलो); गुरप्रीत ंिसंग (७७ किलो); मंजीत (८२ किलो); हरप्रीत (८७ किलो); हरदीप (९७ किलो); नवीन (१३० किलो).