अटक होईपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; पैलवानांचा निर्धार, ब्रीजभूषण सिंह यांची मवाळ भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 07:26 PM2023-04-28T19:26:26+5:302023-04-28T19:27:06+5:30
Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत.
brijbhushan singh news । नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात होत असलेल्या आंदोलनाला आता विविध क्षेत्रातील दिग्गज पाठिंबा देत आहेत. टेनिसपटू सानिया मिर्झासह क्रिकेटपटू हरभजन सिंग आणि सुवर्ण पदक विजेत्या नीरज चोप्राने नाराजी व्यक्त केली आहे. कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयर दाखल करण्याची मागणी घेऊन पैलवानांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. या मागणीला यश आले असून भाजपा खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल होणार असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. दिल्ली पोलिसांनी SC ला सांगितले की WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून FIR दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर बजरंग पुनियाने पत्रकार परिषदेत म्हटले, "लवकरात लवकर कठोर कारवाई करून आरोपीला तुरुंगात टाका. दिल्ली पोलिसांना सर्वोच्च न्यायालयाकडून एफआयआर नोंदवण्याचे आदेश मिळाले आहेत. एखाद्या महासंघाचा प्रमुखच असा छळ करतो, तेव्हा खेळाडू त्याची तक्रार कोणाकडे करणार. महासंघात प्रमुखापेक्षा कोणीही मोठे नाही." केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे खेळाडूंचे फोन उचलत नसल्याचा खुलासाही बजरंगने केला. तर विनेश फोगाटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ब्रिजभूषण सिंह यांना सर्व पदांवरून काढून टाकण्याचे आवाहन केले आहे.
ब्रीजभूषण सिंह यांनी मांडली भूमिका
हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर आहे. न्यायालयाने आज जो काही निर्णय दिला त्याचे मी स्वागत करतो. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर आणि पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर माझा विश्वास आहे. तपासात माझ्या सहकार्याची आवश्यकता असेल तेथे मी सहकार्य करेन, असे भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रीजभूषण शरण सिंह यांनी म्हटले आहे.
The matter is before the Supreme Court. I welcome whatever the Court decided today. I trust the Supreme Court decision and Police investigation process. I will cooperate wherever my cooperation would be needed in the investigation: Brijbhushan Sharan Singh, President, Wrestling… pic.twitter.com/B7PBeiBDr0
— ANI (@ANI) April 28, 2023
दिल्ली पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाला एफआयआरबद्दल माहिती दिली. खरं तर सर्वोच्च न्यायालय ब्रिजभूषण यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप करणाऱ्या महिला कुस्तीपटूंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करत होते. २६ एप्रिल रोजी दिल्ली पोलिसांनी सुप्रीम कोर्टाला सांगितले होते की, आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यापूर्वी आरोपांची प्राथमिक चौकशी करणे आवश्यक आहे.
आखाड्याबाहेरील कुस्तीचा सहावा दिवस
ऑलिम्पिकमधील कांस्य पदक विजेती साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांसह देशातील ७ नामांकित पैलवानांनी रविवारी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. आज आंदोलनाचा सहावा दिवस असून भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू जंतरमंतरवर धरणे आंदोलन करत आहेत. प्रशिक्षक महिलांचा छळ करत आहेत आणि फेडरेशनचे काही जवळचे लोक प्रशिक्षक महिला प्रशिक्षकांशीही गैरवर्तन करतात. ते मुलींचा लैंगिक छळ करतात. भारतीय कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षांनी (ब्रिजभूषण शरण सिंह) अनेक मुलींचा लैंगिक छळ केला आहे, असे गंभीर आरोप महिला पैलवानांनी केले आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"