बजरंग पुनियाच्या अडचणीत वाढ, NADA ने केले निलंबित, जाणून घ्या प्रकरण...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2024 08:34 PM2024-06-23T20:34:48+5:302024-06-23T20:35:31+5:30
दिग्गज भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियावर गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा निलंबनाची कारवाई झाली आहे.
Bajrang Punia Suspended: 2020 च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणारा कुस्तीपटू बजरंग पुनिया पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे. डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत, नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) ने त्याच्यावर पुन्हा निलंबनाची कारवाई केली आहे. यापूर्वी, एप्रिलमध्येही त्याला NADA ने निलंबित केले होते. मात्र, तीन आठवड्यांपूर्वी ADDP ने पुनियाला NADA द्वारे 'नोटिस ऑफ चार्ज' जारी न केल्यामुळे त्याचे निलंबन मागे घेतले होते.
मार्चमध्ये सोनीपत येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान बजरंग पुनियाने लघवीचा नमुना देण्यास नकार दिला होता. त्यामुळे डोपिंग नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला निलंबित करण्यात आले होते. बजरंगने निलंबनाविरुद्ध अपील केले होते. यानंतर 31 मे रोजी NADA च्या शिस्तपालनात्मक डोपिंग पॅनेलने (ADDP) निलंबन मागे घेतले. त्यानंतर आता पुन्हा एकदा NADA ने त्याला तात्पुरते निलंबित केले आहे.
11 जुलै पर्यंत वेळ
NADA ने बजरंगला सांगितले की, त्याच्यावर राष्ट्रीय उत्तेजक विरोधी नियम 2021 च्या कलम 2.3 चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे आणि म्हणून त्याला निलंबित केले जात आहे. या निर्णयाविरुद्ध अपील करण्यासाठी बजरंगकडे 11 जुलैपर्यंत वेळ आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, बजरंगच्या वकिलाने याविरोधात अपील करणार असल्याचे सांगितले आहे.