बजरंग, रितूने जिंकले सुवर्ण
By admin | Published: December 31, 2015 03:24 AM2015-12-31T03:24:08+5:302015-12-31T03:24:08+5:30
बजरंग पुनिया आणि रितू फोगट या भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखताना आपापल्या गटात अपेक्षित सुवर्णपदक पटकावले.
नवी दिल्ली : बजरंग पुनिया आणि रितू फोगट या भारताच्या अव्वल कुस्तीपटूंनी राष्ट्रीय सिनिअर कुस्ती स्पर्धेच्या पहिल्या दिवशी आपला दबदबा राखताना आपापल्या गटात अपेक्षित सुवर्णपदक पटकावले.
बजरंगने पुरुषांच्या ६४ किलो वजनी गटात एकहाती वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण जिंकले, तर रितूने महिलांच्या ४८ किलो वजनी गटाच्या फ्रीस्टाईल प्रकारामध्ये सुवर्ण कमाई केली. दखल घेण्याची बाब म्हणजे स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी स्पर्धा आयोजनातील ढिसाळपणा समोर आला. लढत संपल्यानंतरही त्या लढतीचे निकाल कोणालाही कळाले नव्हते. दुसऱ्या बाजूला पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात सुशील कुमार व नरसिंग यादव यांची अनुपस्थिती स्पष्टपणे जाणवली. मात्र, या गटात या दोन्ही अव्वल मल्लांच्या अनुपस्थित मिळालेल्या संधीचे सोने करताना हरियाणाच्या जितेंदरने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. तर, प्रदीपला या वेळी रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. मनोज व दिनेश यांनी कांस्यपदकाची कमाई केली.
६५ किलो वजनी गटातही याच प्रकारच चित्र पाहायला मिळाले. अव्वल मल्ल योगेश्वर दत्तच्या अनुपस्थित बजरंगने आपला हिसका दाखवताना सुवर्णपदकाला गवसणी घातली. त्याच्या धडाक्यापुढे रजनीशला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तर, मनोज आणि भगत सिंग यांनी कांस्य पटकावले. पुरुषांच्या ५७ किलो वजनी गटात संदीप तोमर आणि रवींद्र यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली.
महिलांच्या ४८ किलो वजनी गटात भारताची सर्वांत अनुभवी खेळाडू रितूने आपल्या लौकिकानुसार वर्चस्व राखताना सहजपणे सुवर्ण कमावले. तिच्या आक्रमकतेपुढे अपर्णा बिश्नी हिने रौप्य, तर पूजा आणि निर्मल यांना कांस्य पटकावण्यात यश आले. त्याचप्रमाणे ५८ किलोवजनी गटात आणि ६३ किलो वजनी गटात अनुक्रमे सरिता आणि अनिता यांनी अव्वल स्थान पटकावले. (वृत्तसंस्था)