बजरंगने दिली पत्नी संगीताला प्रेरणा, ऑलिम्पिकमधील यशाने केले प्रभावित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 10:25 AM2021-08-12T10:25:08+5:302021-08-12T10:28:17+5:30
सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे.
मनोज जोशी -
नवी दिल्ली : साधारणपणे प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचे योगदान असे असते, असे म्हटले जाते. मात्र, टोकियो ऑलिम्पिक पदक विजेता मल्ल बजरंग पुनिया याच्या बाबतीत मात्र असे म्हणावे लागणार नाही. कारण, त्याने आपली पत्नी संगीता हिला प्रेरित केले असून, आता संगीताही बजरंगपासून प्रेरणा घेत आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांसाठी तयारी करण्याचा विचार करत आहे. बजरंगच्याच दर्जाची मल्ल बनण्याचे लक्ष्य संगीताने निर्धारित केले आहे.
सोनिपत येथे निवासस्थानी असलेल्या संगीताने म्हटले की, ‘यंदा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या चाचणीसाठी मी प्रयत्न करणार आहे.’ संगीताला गुढघ्याची दुखापत झाली होती आणि त्यातून ती आता सावरली आहे. शस्त्रक्रियेमुळे तिला अनेक स्पर्धांमधून माघार घ्यावी लागली होती. संगीताने सांगितले की, ‘जर दोघांचे लक्ष्य देशासाठी पदक जिंकण्याचे असेल, तर त्याचे निकालही चांगलेच येतील. आता मी पुन्हा कुस्ती खेळण्यास सुरुवात केली आहे.’ संगीताने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्य पदक जिंकले असून, आशियाई कॅडेट आणि राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धेत रौप्य पदकही जिंकले आहे.
बजरंगने आपल्या ऑलिम्पिक कामगिरीविषयी सांगितले की, ‘ऑलिम्पिक पदक जिंकल्याचा आनंद आहेच, पण देशवासियांच्या अपेक्षेनुसार सुवर्ण मिळवण्यात अपयश आल्याची खंत अजूनही आहे. पण आता देशवासीयांना विश्वास देतो की, पॅरिसमध्ये पदकाचा रंग नक्कीच बदलेल.’
डॉक्टरांचा सल्ला ठरणार महत्त्वाचा
बजरंग म्हणाला, ‘डॉक्टरांशी चर्चा करुनच मी पुढील निर्णय घेईन. माझी दुखापत गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले, तर आगामी जागतिक स्पर्धेऐवजी पुढील वर्षी आशियाई क्रीडा आणि राष्ट्रकुल स्पर्धेवर माझे लक्ष असेल.’
सरावासाठी चांगल्या साथीदाराची गरज
भारतात ६५ किलो वजनी गटात फारसे मल्ल नाहीत. याबाबत बजरंग म्हणाला की, ‘सरावात चांगला साथीदार असेल, तर तयारी चांगली होते. ज्या ताकदीने सराव केला जातो, त्याची कमतरता मला प्रत्यक्षात राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत भासते. ऑलिम्पिकआधी रशियात केलेली तयारी जागतिक दर्जाची होती. ज्या अकादमीमध्ये मी सराव करत होतो, तिथेच रशियाचा २०१६ सालचा चॅम्पियन सोसलान आणि ७४ किलो गटाचा ऑलिम्पिक विजेता घडला. जर मी सुवर्ण जिंकले असते, तर माझाही फोटो त्या अकादमीमध्ये लावण्यात आला असता.’