बाल उत्कर्ष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा-महात्मा गांधी या संघाना जेतेपद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2018 07:48 PM2018-03-26T19:48:21+5:302018-03-26T19:48:21+5:30
तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
मुंबई : महिंद्रा आणि महात्मा गांधी या संघांनी बाल उत्कर्ष क्रीडा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे अजिंक्यपद मिळविले. तीन दिवसांपूर्वी झालेल्या मुंबई महापौर कबड्डी स्पर्धेत हेच दोन संघ विजेते ठरले होते. महिंद्राचा आनंद पाटील आणि महात्मा गांधींची पूजा किणी स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.
मुंबई, लालबाग येथील गणेश गल्ली मैदानावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महिंद्राने आपला पारंपारिक प्रतिस्पर्धी एअर इंडियाचे आव्हान ३९-२३असे सहज परतवीत बाल उत्कर्ष चषक पटकावला. सुरुवाती पासून आक्रमक खेळ करत मध्यांतराला २३-१० अशी घेणाऱ्या महिंद्राने नंतर देखील एअर इंडियाला जवळपास येण्याची संधी दिली नाही. आनंद पाटील, अजिंक्य पवार यांना थोपविणे एअर इंडियाला जमले नाही. तसेच महिंद्राने क्षेत्ररक्षण भेदणे एअर इंडियाच्या चढाईपट्टूना जड जात होते. महिंद्राच्या स्वप्नील शिंदेचा बचाव उत्तम होता. एअर इंडियाच्या उमेश म्हात्रे, आशिष मोहिते यांना या सामन्यात सूर सापडला नाही.
महिलांच्या अंतिम सामन्यात महात्मा गांधीने संघर्षाचा दुबळा प्रतिकार ३६-१८असा संपुष्टात आणत बाल उत्कर्ष चषक आपल्या नावे केले. नुकत्याच झालेल्या महापौर चषकावर आपले नाव कोरल्याने उत्साह द्विगुणित झालेल्या महात्माने त्याच आत्मविश्वासाने खेळ करीत हा सामना सहज खिशात टाकला. उत्तरार्धात जोरदार खेळ करीत २०-१०अशी आघाडी घेणाऱ्या महात्माने उत्तरार्धात त्याच तडफेने खेळ करी हा सामना १८गुणाने जिंकला. पूजा किणी,सायली जाधव यांच्या झंजावाती चढायांना संघर्षकडे उत्तर नव्हते. तसेच सृष्टी चाळके, तेजस्वी पाटेकर यांच्या अभेद्य क्षेत्ररक्षण भेदून कोमल देवकर, निखिता यांना गुण मिळविणे जमत नव्हते.पूजा जाधव, दीपा बुर्ते यांचा बचाव देखील दुबळा ठरला.