राष्ट्रीय तालीम संघातून बाळासाहेब लांडगे निलंबित, विश्वस्त मंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 04:36 AM2017-12-24T04:36:28+5:302017-12-24T04:36:41+5:30
राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.
पुणे : राष्ट्रीय तालीम संघाची बदनामी केल्याच्या आरोपावरुन कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांचे राष्ट्रीय तालीम संघातून निलंबन करण्यात आले आहे. त्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय (वरिष्ठ) समिती स्थापन करण्यात येणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रीय तालीम संघाचे विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी दिली.
तालीम संघाच्या विश्वस्त मंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. तालीम संघाने लांडगे यांना ३० नोव्हेंबर २०१७रोजी कारणेदाखवा नोटीस बजावली होती. त्यात आपण तालीम संघाच्या हिताविरोधात कृत्य करीत असल्याचे, तसेच संघाची बदनामी करणाºया व्यक्तींना पाठबळ देत असल्याचे म्हटले आहे. यावर आपण सात दिवसांत खुलासा न केल्यास आपले सदस्यत्व व प्रतिनिधीत्व रद्द करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.
लांडगे यांच्याकडून त्याबाबतचा खुलासा न मिळाल्याने विश्वस्त मंडळाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यांचे गुलशे तालिमीकडून राष्ट्रीय तालीम संघाकडे आलेले सदस्यत्व व आजीव सभासदत्व निलंबित करण्यात आले आहे. या घटनेच्या चौकशीसाठी वरिष्ठ समिती नेमण्यात येणार आहे. त्यांचा निर्णय होईपर्यंत राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने राज्य कुस्तीगीर परिषदेतील आपले प्रतिनिधित्व देखील रद्द करण्यात येत आहे. आपणास राष्ट्रीय तालीम संघाच्या कोणत्याही बैठकीत सहभागी होता येणार नाही. तसेच, राज्य कुस्तीगीर परिषदेच्या सभेतही आपल्याला सहभागी होता येणार नसल्याचे तालीम संघाने स्पष्ट केले आहे. संघाचे विश्वस्त अध्यक्ष दामोदर टकले, विश्वस्त नारायण पवार, ज्ञानोबा भिंताडे आणि विश्वस्त कार्याध्यक्ष योगेश दोडके यांनी हा निर्णय घेतला आहे.
याबाबत माहिती देताना दोडके म्हणाले, राष्ट्रीय तालीम संघाच्या नावानेच लांडगे गेली ३५ वर्षे राज्य कुस्तीगीर परिषदेवर प्रतिनिधीत्व करीत आहेत. तरीही ते सातत्याने संघाची बदनामी करीत असतात. यापूर्वी त्यांना अनेकदा तोंडी बजावण्यात आले होते. त्यानंतरही त्यांनी बदनामी करण्याचे सुरुच ठेवल्याने निलंबनाची कारवाई करण्यात आली. लांडगे यांच्या चौकशीसाठी लवकरच उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात येईल. जर त्यांनी योग्य खुलासा केल्यास, त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात येईल. अन्यथा त्यांचे पद कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल. याबाबत लांडगे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही.