बलजिंदरची विक्रमी फेक
By admin | Published: June 27, 2015 01:16 AM2015-06-27T01:16:40+5:302015-06-27T01:16:40+5:30
महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सेनादलाच्या बलजिंदर सिंग याने सर्वांचे लक्ष वेधताना गोळाफेक स्पर्धेत तब्बल ३३
मुंबई : महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी सेनादलाच्या बलजिंदर सिंग याने सर्वांचे लक्ष वेधताना गोळाफेक स्पर्धेत तब्बल ३३ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडताना सहज बाजी मारली. त्याचवेळी महिला गटात रायगडच्या मेघा परदेसी हिने गोळाफेक आणि भालाफेक प्रकारात सुवर्ण पटकावताना आपली छाप पाडली.
मुंबई उपनगर हौशी अॅथलेटिक्स संघटनेच्या वतीने कांदिवली येथील स्पोटर््स आॅथॉरिटी आॅफ इंडिया (साई) येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी राज्य विक्रमाची नोंद झाली. बलजिंदर याने १६.२६ मीटरची जबरदस्त फेक करताना सहजपणे बाजी मारली. या वेळी त्यान जिनशा इराणीने नोंदवलेला राज्य विक्रम मोडला. बलजिंदरच्या या धडाक्यापुढे राहुल कृष्णा (ठाणे) आणि गोविंद राय (नाशिक) यांनी अनुक्रमे १३.८६ मीटर आणि १३.४१ मीटरची फेक करून द्वितीय व तृतीय स्थानावर कब्जा केला.
महिला गटात पहिल्या दिवशी रायगडच्या मेघाने दोन सुवर्णपदकांची कमाई करून वर्चस्व राखले. सर्वप्रथम तिने गोळाफेक स्पर्धेत ११.६१ मीटरची फेक करून सुवर्ण निश्चित केले. या वेळी दिव्या सोनार (नाशिक) व सारा वोरा (ठाणे) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय स्थान पटकावले. यानंतर मेघाने हाच धडाका कायम राखताना भालाफेक स्पर्धेत ४१.९३ मीटरची शानदार फेक करताना मेघाने दुसरे सुवर्ण पटकावले. यामध्ये अप्लेश लांबा आणि अनिता पटेल या दोन्ही मुंबई शहरच्या खेळाडूंना अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले. त्याचवेळी १०० मीटर स्प्रिंट शर्यतीमध्ये पुरुष गटात ठाण्याच्या गौरांग आंब्रे याने तर महिला गटात पुण्याच्या भाग्यश्री शिर्के यांनी बाजी मारली. (क्रीडा प्रतिनिधी)