‘बीसीसीआय’ची ओझावर बंदी
By Admin | Published: December 29, 2014 04:25 AM2014-12-29T04:25:05+5:302014-12-29T04:25:05+5:30
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अवैध गोलंदाजी शैलीमुळे फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे़
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अवैध गोलंदाजी शैलीमुळे फिरकी गोलंदाज प्रज्ञान ओझा याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे़
रणजी ट्रॉफीत हैदराबादकडून खेळणाऱ्या ओझाच्या अवैध गोलंदाजी शैलीची माहिती हैदराबाद क्रिकेट संघटनेला (एचसीए) देण्यात आली आहे़ या खेळाडूला आपल्या गोलंदाजी शैलीत सुधारणा करावी लागणार आहे, असे ‘बीसीसीआय’ने स्पष्ट केले आहे़
‘एचसीए’चे सचिव पुरुषोत्तम अग्रवाल यांनी सांगितले की, आम्हाला ‘बीसीसीआय’कडून अधिकृतरीत्या पत्र मिळाले आहे़ या पत्रात प्रज्ञान ओझा याला गोलंदाजी शैलीत सुधारणा करण्यासाठी चेन्नई येथे पाठविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा उल्लेख आहे़ आपल्या प्रभावी गोलंदाजीच्या बळावर अत्यंत कमी सामन्यात बळींचे शतक साजरे करणाऱ्या ओझाने २४ कसोटीत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे़
त्यात त्याने ११३ गडी बाद केले आहेत़ या बरोबर त्याने १८ एकदिवसीय सामन्यांमध्ये एकूण २१ बळी मिळविले आहे़ याव्यतिरिक्त त्याने सहा ‘टी-२०’च्या सामन्यांमध्ये दहा विकेट मिळविल्या आहेत़ (वृत्तसंस्था)