दत्तू भोकनळवरील बंदी हटवली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2020 03:55 AM2020-01-24T03:55:39+5:302020-01-24T03:55:57+5:30
भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली.
नवी दिल्ली - भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष नरिंंदर बत्रा यांनी केलेल्या मध्यस्थीनंतर भारताचा नौकानयनपटू याच्यावरील दोन वर्षाची बंदी गुरुवारी मागे घेण्यात आली. दत्तूवर आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर दोन वर्षाची बंदी घालण्यात आली होती. आशियाई क्रीडा स्पर्धेत दत्तूचा सहभाग असलेल्या भारतीय संघाने पुरुष क्वाड्रपल स्कल्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते. मात्र दत्तूने ही स्पर्धा अर्ध्यातच सोडली होती. त्यामुळे भारतीय नौकानयन संघटनेने (आरएफआय) त्याच्यावर मागील वर्षी दोन वर्षाची बंदी घातली होती.
दत्तूने दिलेल्या स्पष्टीकरणात म्हटले होते की, नावेतून खाली पडल्यानंतर त्याला बरे वाटत नव्हते. त्यामुळे त्याने अर्ध्यातच स्पर्धा सोडली होती. नरिंंदर बत्रा यांंनी या निर्णयावर फेरविचार करावा असे आवाहन केले होते. त्यानंतर राष्ट्रीय नौकानयन संघटनेचे अध्यक्ष राजलक्ष्मी सिंग देव यांनी भोकनळवरील बंदी हटवण्यात आल्याचे बत्रा यांना कळवले आहे.
देव यांनी बत्रा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ‘दत्तू भोकनळवरील दोन वर्षाची बंदी २३ जानेवारी २०२० पासून हटवण्यात आली आहे. त्याचबरोबर त्याने कोरियामध्ये २७ ते ३० एप्रिल या काळात होणाऱ्या सरावात सहभागी व्हावे.’ (वृत्तसंस्था)