अष्टपैलू अक्षरसमोर बंगळुरू नतमस्तक
By admin | Published: May 5, 2017 11:33 PM2017-05-05T23:33:40+5:302017-05-06T00:57:20+5:30
अक्षर पटेलने केलेल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर 19 धावांनी मात केली
बंगळुरु : प्ले आॅफमध्ये प्रवेश करण्याच्या आशा कायम राखताना किंग्ज इलेव्हन पंजाबने खराब फॉर्मशी झगडत असलेल्या रॉयल चँलेंजर्स बँगलोरला १९ धावांनी नमवले. स्पर्धेतील आव्हान कधीच संपुष्टात आलेल्या आरसीबीच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झाला नाही. औपचारीकता उरलेल्या सामन्यांत विजय मिळवून प्रतिष्ठा जपण्याचे आव्हान असलेल्या आरसीबीला १२ सामन्यांतून नववा पराभव पत्करावा लागला. त्याचवेळी पंजाब १० गुणांसह गुणतालिकेत पाचव्या स्थानी असून त्यांचे अद्याप ४ सामने शिल्लक आहेत. प्ले आॅफ गाठण्यासाठी हे सर्व सामने जिंकणे पंजाबसाठी अनिवार्य आहे. घरच्या मैदानावर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारताना आरसीबीने पंजाबला ७ बाद १३८ असे मर्यादित धावसंख्येत रोखले. मात्र, तरीही फलंदाजांनी पुन्हा एकदा कच खाल्याने त्यांच्या पराभवाची मालिका कायम राहिली. आरसीबीला १९ षटकात ११९ धावांमध्ये गुंडाळत पंजाबने १९ धावांनी बाजी मारली. सलामीवीर मनदीप सिंगने ४० चेंडूत ६ चौकार व २ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. मात्र, इतर सर्व फलंदाज अपयशी ठरले. ख्रिस गेल (०), कर्णधार विराट कोहली (६), एबी डिव्हिलियर्स (१०), केदार जाधव (६), शेन वॉटसन (३) हे स्टार फलंदाज सपशेल अपयशी ठरले. पवन नेगीमुळे (२१) आरसीबीला शतकी मजल मारता आली. संदीप शर्मा व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी ३ बळी घेत आरसीबीचे कंबरडे मोडले. तत्पूर्वी, सुरुवातीला झटपट तीन धक्के बसल्याने पंजाबने ७ बाद १३८ धावांची मजल मारली. हाशिम आमला (१), मार्टिन गुप्टील (९) यांना स्वस्तात बाद केल्यानंतर आरसीबीने अचूक टप्प्यावर मारा करत पंजाबला बॅकफूटवर नेले. यावेळी, शॉन माशने ३ चौकार मारुन पंजाबच्या आशा उंचावल्या, परंतु फिरकी गोलंदाज पवन नेगीने मार्शला (२०) तंबूचा रस्ता दाखवला. मनन वोहरा (२५) - वृध्हिमान साहा (२१) यांनी पंजाबची पडझड रोखण्यावर भर दिला. युझवेंद्र चहलला षटकार मारण्याच्या नादात वोहरा झेलबाद झाल्यानंतर ठराविक अंतराने फलंदाज बाद झाल्याने पंजाबची घसरगुंडी उडाली. (वृत्तसंस्था) ()अक्षर पटेलने निर्णायक नाबाद ३८ धावांची आक्रमक खेळी केली. अनिकेत चौधरी (२/१७) व युझवेंद्र चहल (२/२१) यांनी पंजाबला रोखले. (वृत्तसंस्था)
संक्षिप्त धावफलक :
किंग्ज इलेव्हन पंजाब : २० षटकात ७ बाद १३८ धावा (अक्षर पटेल ३८*, मनन वोहरा २५; अनिकेत चौधरी २/१७, युझवेंद्र चहल २/२१) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : १९ षटकात सर्वबाद ११९ धावा (मनदीप सिंग ४६; अक्षर पटेल ३/११, संदीप शर्मा ३/२२) किंग्ज इलेव्हन पंजाब हाशिम आमला झे. जाधव गो. चौधरी १, मार्टीन गप्टील झे. नेगी गो. अरविंद ९, शॉन मार्श झे. मनदीप सिंग गो. नेगी २०, मनन वोरा झे. डीव्हीलियर्स गो. चहल २५, वृद्धीमान सहा त्रिफळा गो. वॉटसन २१, ग्लेन मॅक्सवेल झे. बद्री गो. चहल ६, अक्षर पटेल नाबाद ३८, मोहित शर्मा झे. जाधव गो. चौधरी ६, वरून एरॉन नाबाद ०. अवांतर १२, एकूण २० षटकांत ७ बाद १३८. गोलंदाजी : चौधरी ४-१-१७-२, अरविंद २-०-१३-१, वॉटसन ४-०-४३-१, बद्री ३-०-१४-०, नेगी ३-०-२१-१, चहल ४-०-२१-२.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर - मनदीप सिंग त्रिफळा गो. मॅक्सवेल ४६, गेल झे. गप्टील गो. संदीप शर्मा ०, विराट कोहली त्रिफळा गो. संदीप शर्मा ६, ए बी डीव्हीलिअर्स झे. सहा गो. संदीप शर्मा १०, केदार जाधव झे. पटेल गो. मोहित शर्मा ६, वॉटसन झे. सहा गो. पटेल ३, नेगी झे. सहा गो. पटेल २१, अरविंद पायचित गो. मॅक्सवेल ४, सॅम्युअल बद्री त्रिफळा गो. पटेल ८, अनिकेत चौधरी झे. गप्टील गो. मोहित शर्मा ४, यजुवेंद्र चहल नाबाद ४. अवांतर ७, एकूण १९ षटकांत सर्वबाद ११९. गोलंदाजी : संदीप शर्मा ४-०-२२-३, नटरंजन १-०-१५-०, वरून एरॉन ४-०-२८-०, मोहित शर्मा ४-०-२४-२, अक्षर पटेल ३-०-११-३, ग्लेन मॅक्सवेल ३-०-१५-२.