दिल्लीचा पराभव करत बॅँगलोरची प्लेऑफमध्ये धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 11:19 PM2016-05-22T23:19:30+5:302016-05-22T23:19:30+5:30
कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने दिलेले १३९ धावांचे आव्हान १९ व्या षटकात ६ राखून बॅँगलोरने सहज पार करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
Next
>ऑनलाइन लोकमत
रायपूर, दि. २२ : कर्णधार विराट कोहलीने केलेल्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर दिल्लीने दिलेले १३९ धावांचे आव्हान १९ व्या षटकात ६ राखून बॅँगलोरने सहज पार करत दिमाखात प्लेऑफमध्ये प्रवेश केला. कोहलीने ४५ चेंडूत ५४ धावांची नाबद मॅच विनिगं खेळी केली. तर के राहूल याने मधल्या फळीत दर्जेदार फलंदाजी करताना २३ चेंडूत ३८ धावांचे योगदान दिले. गेल १, डिव्हिलर ६, वॅटसन १४ हे आपल्या लौकिकास साजेशी खळी करण्यात अपयशी ठरले. बिन्नीने नाबाद १६ धावांचे योगदान दिले.
त्यापुर्वी, युजवेंद्र चहलच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बॅँगलोरने ‘करा अथवा मरा’ या लढतीत क्विंटन डिकॉकच्या अर्धशतकी खेळीनंतरही दिल्ली डेअरडेव्हिल्सला ८ बाद १३८ या धावसंख्येवर रोखले.
चहलने ३२ धावांत ३ गडी बाद केले. त्यामुळे दिल्ली संघाने नियमित अंतराने त्यांचे फलंदाज गमावले. ख्रिस गेलनेदेखील ११ धावांत २ गडी बाद केले. दिल्लीकडून सलामीवीर डिकॉकने ५ चौकार व एका षटकारासह ५० चेंडूंत ६० धावांची खेळी केली; परंतु अन्य फलंदाज मोठे योगदान देऊ शकले नाहीत. अखेरीस ख्रिस मॉरिसने १८ चेंडूंत नाबाद २७ धावा करीत संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.
नाणेफेक गमावून फलंदाजी करणाऱ्या दिल्ली संघाची सुरुवात चांगली झाली नाही, ऋषभ पंत फक्त एका धावेवर श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर बाद झाला. विशेष म्हणजे अरविंदच्या गोलंदाजीवर सलामीवीर डिकॉकदेखील सुदैवी ठरला. डिकॉकने नंतर अरविंदच्या पुढच्या षटकात षटकार व चौकार मारला. करुण नायर (११) यानेदेखील शेन वॉटसनला षटकार ठोकला; परंतु लेगस्पिनर चहलच्या चेंडूवर कर्णधार विराट कोहलीने मागे धावत जाताना त्याचा शानदार झेल टिपला. दिल्लीला पॉवरप्लेमध्ये २ बाद ४३ धावाच करता आल्या. संजू सॅमसन (१७) याने चहलच्या चेंडूवर षटकार ठोकला आणि पुढच्या षटकातही चौकार मारला; परंतु याच गोलंदाजाच्या पुढच्या चेंडूवर तो राहुलच्या हाती झेल देऊन बसला.