बेंगळुरू विरुद्ध दिल्ली सामना पावसामुळे रद्द
By admin | Published: May 17, 2015 05:42 PM2015-05-17T17:42:27+5:302015-05-17T19:56:23+5:30
दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामन्यावर पावसाने पाणी फेरले असून हा सामना रद्द करण्यात आला आहे.
ऑनलाइन लोकमत
बेंगळुरु, दि. १७ - दिल्ली डेअरडेव्हिल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु सामन्यावर पावसाने पाणी फेरले असून हा सामना रद्द करण्यात आला आहे. दोन्ही संघाना एक - एक गूण देण्यात आले असून या एका गुणासह बेंगळुरुने प्ले ऑफमध्ये जागा पटकावली आहे.
रविवारी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर बेंगळूरु व दिल्ली डेअरडेव्हिल्स हे संघ आमनेसामने असून बेंगळुरुने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या पर्वात सुर न सापडलेल्या दिल्लीच्या फलंदाजांनी शेवटच्या सामन्यात आक्रमकपणा दाखवत बेंगळूरच्या गोलंदाजांची धुलाई केली. डीकॉक व श्रेयस अय्यरने ६ षटकांत ५० धावा चोपून संघाल अर्धशतकी सलामी दिली. अय्यर २० धावांवर बाद झाला. यानंतर डीकॉक व कर्णधार ड्यूमिनीने बेंगळूरच्या गोलंदाजांना चांगलेच चोपले. डिकॉक ३९ चेंडूच ६९ धावा करुन माघारी परतला. युवराज सिंग व केदार जाधव स्वस्तात बाद झाले. पण ड्यूमिनीने एकाकी झुंज देत ४३ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. बेंगळूरतर्फे हर्षल पटेल व युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. या सामन्यात विजय मिळवून आयपीएलमधील यंदाच्या पर्वातील शेवट गोड करण्याचा दिल्लीचा इरादा होता. पण दिल्लीच्या या इराद्यावर पावसाने पाणी फेरले.
बेगंळूरने १.१ षटकांत बिनबाद दोन धावा केल्या. यानंतर पावसाने दमदार हजेरी लावल्याने सामना थांबवण्यात आला. पंचांनी दोनदा खेळपट्टीची पाहणी केली. मात्र शेवटी हा सामना रद्द करण्यात आला.